बोदवड – देव व संतांची मंदिरे धर्म व अध्यात्माचा केंद्रबिंदू आहेत. आपले मन व शरीर एकाग्र करून परमात्माप्राप्तीच्या मार्गातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे मंदिरे होय. मंदिरांमधून सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जेची निर्मिती होत असल्याने आध्यात्मिक व मानसिक शांती मिळण्यासाठी गावागावात मंदिरांची उभारणी व्हायला हवी, असे प्रतिपादन मेहूण-चिंचोल येथील श्रीयज्ञेश्वर आश्रमाचे अध्यक्ष शारंगधर महाराज मेहूणकर यांनी केले.

बोदवड तालुक्यातील चिखली बुद्रूक येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. श्रीक्षेत्र मेहूण-चिंचोल येथील श्रीयज्ञेश्वर आश्रमाचे अध्यक्ष हभप शारंगधर महाराज मेहूणकर यांच्या प्रेरणेने व हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अशोक पाटील, अनिल पाटील व मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यातून श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर उभारले आहे. स्व. शालिग्राम टिल्लूजी पाटील यांनी मंदिरासाठी जागा दान दिली असून स्व. सुरेश विश्वनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या योगिता पाटील यांच्यातर्फे श्रीविठ्ठल रूक्मिणी मूर्ती सप्रेम भेट देण्यात आल्या आहेत. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विलास गजानन पाटील यांच्यातर्फे मूर्तींना वेशभूषा करण्यात आली. तीनदिवसीय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पहिल्या दिवशी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी होमहवन, यज्ञ, महापूजा, महाआरती करण्यात आली. सायंकाळी हरिपाठ व रात्री हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांचे कीर्तन झाले. तिसऱ्या दिवशी काकडाआरती, उत्तरपूजा, कलशपूजन, कलश स्थापना, ध्वजारोहण व श्रीविठ्ठल रूक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मूर्तींची प्राणप्रतिष्ठा गुरूवर्य हभप शारंगधर महाराज मेहूणकर यांच्या हस्ते तर अभिषेक पाटील व सौ. मनस्वी पाटील या दाम्पत्याच्या हस्ते मुख्य अभिषेक पार पडला. तसेच विनोद पाटील व सौ. दर्शना पाटील, सचिन शेळके व सौ. मनीषा शेळके, सागर गावंडे व सौ. वैष्णवी गावंडे, अभिजीत गोळे व सौ. श्रद्धा गोळे, संदीप देवरे व सौ. रूचिता देवरे, पुष्कर पाटील व सौ. तेजस्विनी पाटील या जोडप्यांच्या हस्ते होमहवन, यज्ञ, महापूजा तसेच महाआरती करण्यात आली. त्यानंतर हभप शारंगधर महाराज मेहूणकर यांचे कीर्तन झाले. भारतीय नौदलात नियुक्ती झालेली कु. वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील, एमबीबीएस पदवी विशेष प्रविण्याने उत्तीर्ण डॉ. वैष्णवी मनोज पाटील आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांचा सत्कार हभप शारंगधर महाराज मेहूणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चंद्रकांत महाराज साकरीकर, त्र्यंबक महाराज आकोटकर, लक्ष्मण महाराज चिखलीकर, मंगेश महाराज चिखलीकर, प्रेमचंद फेगडे महाराज, निवृत्ती महाराज, दहिद येथील भजनी मंडळ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुनील पाटील, उमेश पाटील, निळकंठ पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह चिखली बुद्रूक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी – श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरासाठी जागा दान देणाऱ्या स्व. शालिग्राम टिल्लूजी पाटील यांच्या मुलांचा संत मुक्ताईंची प्रतिमा भेट देऊन सत्कार करताना शारंगधर महाराज, लक्ष्मण महाराज, चंद्रकांत महाराज व इतर


