भुसावळ-पुणे नवीन गाडीचा प्रस्ताव डीआरएम कार्यालयाकडून मुख्यालयाला रवाना -भुसावळ विभागात रेल्वे सल्लागार समितीची बैठक

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून भुसावळ ते पुण्यासाठी नवीन रेल्वे गाडीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात आला आहे, त्यास मंजूरी मिळाल्यावर पुण्यासाठी नवीन गाडी सुरू होईल, असे रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत डीआरएम ईती पांडे यांनी सदस्य अनिरूध्द कुळकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. भुसावळ विभागातील रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन बुधवारी दुपारी डीआरएम कार्यालयात करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत केले.

पाचोरा रेल्वे स्थानकाचे खुलवावे सौंदर्य
पाचोर्‍याचे सदस्य दिलीप पाटील यांनी पाचोरा जंक्शनच्या प्रवेशद्वारावर ऐतिहासिक असलेले पीजे रेल्वे इंजिन बसवून जंक्शनच्या सौंदर्यात भर वाढावी यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून पाचोरा स्टेशन वर कोच पोझिशन इंडिकेटर, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, तसेच 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस व 11113 देवळाली-भुसावळ मेमूच्या वेळत बदल करण्याची मागणी केली.

प्रवासी सुविधा वाढवण्याबाबत सदस्यांचा आग्रह
या बैठकीत उपस्थित सदस्यांनी आपल्या भागातील प्रवासी सुविधा वाढविण्याबाबत आणि रेल्वेशी संबंधित समस्या तातडीने सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. डीआरएम ईती पांडे यांनी भुसावळ विभागात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रवासी सुविधांच्या विकासाला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची ग्वाही त्यांनी सदस्यांना दिली. यावेळी समितीच्या सदस्यांनी आपापल्या भागातील रेल्वे समस्या, नवीन गाड्या चालवणे, गाड्यांचे थांबे वाढवणे, गाड्यांचा विस्तार करणे आदी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत आणि स्थानकांवर प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सूचना केल्या. डीआरएम पांडे यांनी त्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत अनिरुद्ध कुलकर्णी (भुसावळ), किरण बोरसे (नाशिक), महेंद्र कुमार बुरड (मलकापूर), दिलीप पाटील (पाचोरा), किरण राणे आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.