ऑईल कंपनी कंपनीच्या मॅनेजरला पिस्टल दाखवत 12 लाख लूटले : मांडवेदिगरजवळील धक्कादायक घटना -पाळत ठेवून जबरी लुटीचा संशय : रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी, फुटेज तपासले


भुसावळ : नशिराबाद येथील ऑईल मिलमध्ये मॅनेजर असलेल्या तरुणाकडील 11 लाख 77 हजार 742 रुपयांची रोकड भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर गावानजीक पिस्टलाच्या धाकावर त्रिकूटाने लूटली होती. ही धक्कादायक घटना बुधवार, 3 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती. या लूट प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लूटीच्या अनुषंगाने मॅनेजर सोबत जाणार्‍या हमालाची तसेच ऑईल मिलमधील काही कामगारांची गुरुवारी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पिस्टल दाखवत रक्कम लूटली
नशिराबाद येथे व्यापारी राजू कौरीया यांची ऑईल मिल असून या ऑईल मिलमध्ये मॅनेजर म्हणून भीमराव लक्ष्मण तायडे (44, तोरणाडे, ता.जामनेर, ह.मु.दत्त चैतन्य नगर, हनुमान मंदिराजवळ, पाचोरा रोड, जामनेर) हा तरुण नोकरीला आहे. बुधवारी सायंकाळी व्यवहारानिमित्त आलेली 11 लाख 77 हजारांची रोकड घेवून मॅनेजर तरुण कंपनीतील एका हमालाला सोबत घेवून दुचाकीवरून जामनेरकडे निघाला होता. कुर्‍हेपानाचे ओलांडल्यानंतर मांडवेदिगर गावाजवळील महादेव माळ फाटा ते मांडवा दिगर फाट्यादरम्यान पाठीमागून तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दुचाकीवरील त्रिकूटाने तायडे यांच्या दुचाकीपुढे दुचाकी लावली व पिस्टल दाखवत तरुणाकडील रोकड असलेली बॅग हिसकावली. यावेळी तरुण व आरोपींमध्ये झटापटदेखील झाली मात्र 11 लाख 77 हजार 742 रुपये असलेली बॅग घेवून क्षणात आरोपी जामनेरकडे धूम स्टाईल पसार झाले. दरम्यान, लूटीची घटना घडताना एक रीक्षा चालक भुसावळच्या दिशेने येत असताना त्याने मॅनेजरला धीर देत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आणले व त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
पोलिसांना घटनेची माहिती कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, तालुक्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, जामनेर निरीक्षक किरण शिंदे , भुसावळ तालुक्याचे सहायक निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेतली. तक्रारदार तायडे यांची सखोल चौकशी करून नेमकी घटना जाणण्यात आली.

संशयीतांची चौकशी : फुटेजचा शोध
गुरुवारी दिवसभरात जळगाव गुन्हे शाखेसह भुसावळ तालुका पोलिसांकडून तक्रारदारासह दुचाकीवरील हमाल तसेच कंपनीतील काही कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली तर कुर्‍हेपानाचे ते जामनेर शहरापर्यंतच्या रस्त्यावरील विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीद्वारे संशयीतांची छबी निष्पन्न करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रेकॉर्डवरील आरोपींनी पाळत ठेवून मॅनेजरचा नित्यक्रम माहित करून ही जबरी चोरी केल्याचा दाट संशय आहे.