पोलीस खात्यात नोकरीच्या आमिषाने भुसावळात दोघांना 14 लाखांचा गंडा : मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा –

भुसावळ : पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भुसावळ शहरातील दोघा तरुणांना 14 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एक दिवसांपूर्वीच रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भुसावळातील दोघा भावंडांना 30 लाखांचा गंडा घालण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पुन्हा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर बेरोगारांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील त्रिकूटाविरोधात गुन्हा
विजय नारायण सोनवणे (35, आरपीएफ बॅरेक, द्वारका नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 2022 ते 14 जून 2022 दरम्यान संशयितांची ओळख झाल्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून सोनवणे यांची सहा लाखात तर साक्षीदार आकाश प्रकाश भालेराव यांची आठ लाख रुपयात फसवणूक केली. रक्कम देवूनही नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच संशयितांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. याप्रकरणी राघवेंद्र महादेव पाटील व गौरी राघवेंद्र पाटील (मुंबई टिटवाळा, कल्याण) व अनिल सपकाळ (खडकपाळा, कल्याण) यांच्याविरोधात शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.