रावेर लोकसभेसाठी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना महाविकास आघाडीकडून संधी ! चौधरी समर्थकांमध्ये आनंदाची लहर : फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांचा जल्लोष :

भुसावळ : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केल्यानंतर रावेरच्या जागेवर खडसे परीवारातील सदस्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने या जागेवर कुणाला संधी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना उमेदवारी लढवण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत अधिकृतरीत्या घोषणा झाली नसलीतरी चौधरींना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. माजी आमदार चौधरी यांनी या संदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सोमवारीदेखील भेट घेतल्याचे सांगण्यात आले.
रावेर लोकसभेसाठी खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा भाजपाने संधी दिल्यानंतर मविआकडून मात्र या जागेवर अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही. आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास स्पष्टपणे नकार दिला तर दुसरीकडे राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी नाशिकच्या बैठकीत अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करीत त्यांना उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला मात्र अ‍ॅड.रोहिणी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार देत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता मविआकडून तुल्यबळ उमेदवाराला संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

माजी आमदार संतोष चौधरींना उमेदवारी मिळण्याचे संकेत !
रावेर लोकसभेची निवडणूक भाजपासाठी सोपी ठरू नये यासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. तुल्यबळ उमेदवार म्हणून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे पाहिले जात आहे. चौधरी यांच्या नावाबाबत अधिकृतरीत्या घोषणा झाली नसलीतरी शरद पवारांकडून चौधरी यांना कामाला लागण्याचे संकेत मिळाल्याचे समजते. भुसावळात आज चौधरींच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीदेखील केली.
राष्ट्रवादीकडून चौधरींना उमेदवारी मिळाल्यास रावेरची लढत अत्यंत चुरशीची होईल यात शंकाच नाही. राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी चौधरींच्या नावाला सकारात्मक दर्शवली आहे. कुठल्याही परीस्थितीत हा जागा खेचून आणण्याचा चंग राष्ट्रवादीतील निष्ठावान नेत्यांनी बांधला आहे. उमेदवारीबाबत नेमकी घोषणा झाल्यानंतर रावेरच्या जागेबाबत अधिकृतरीत्या कळणार असलेतरी चौधरी समर्थकांमध्ये संतोष चौधरींना संधी मिळणार असल्याने आनंदाची लहर पसरली आहे. मंगळवारी माजी आमदार चौधरी शहरात परतणार असल्याने त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होवू शकणार आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीदेखील संतोष चौधरी यांनाच संधी मिळणार असल्याचे वृत्त दिले आहे.