भुसावळ : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्या कुटुंबीयांना गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी 137 कोटींचा दंड सुनावण्यात आला होता मात्र राज्य शासनाने विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरवत या अनुषंगाने होणार्या कारवाईला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे खडसेंसह परीवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील गट क्रमांक 225/2मध्ये एक लाख अठरा हजार 202 ब्रास अतिरिक्त अवैधरित्या उत्खनन केल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह परीवारातील सदस्यांना 137 कोटींचा दंड सुनावण्यात आला होता. आमदार एकनाथराव थ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, सून खासदार रक्षा खडसे यांच्यासह सहा शेतजमीन मालकांना 6 ऑक्टोबर 2023 रोजी तब्बल 137 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची नोटीस बजावण्यात आली होती.
कक्षाधिकारी सदानंद मोहिते यांच्या नावानिशी निघालेल्या आदेशानुसार विशेष तपास पथकाने शासनास अहवाल सादर केला असून त्यातील निष्कर्ष पाहता संबंधितांना नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार बाजू मांडण्याची संधी विशेष पथकाने दिलेली नाही. त्यामुळे अहवाल सदोष असल्याचे दिसून येते. त्यामुळे या अहवालानुसार होणारी कार्यवाही संस्थगित करण्यात येत आहे.

एकतर्फी कारवाईबाबत दखल घेण्याची केली होती मागणी
आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, कुठलीही कायदेशीर, शासकीय प्रक्रिया पार न पाडता दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. या प्रश्नी आपण मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांसह प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली तसेच एकतर्फी सुरू असलेल्या कारवाईविषयी शासनाने दखल घेण्याची मागणी केली होती. त्यावर शासनाने निर्णय घेतला असून निवासस्थानी आदेशाची प्रत आल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.


