मुक्ताईनगर :-

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे चार प्रमुख धामापैकी एक आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर व योगिराज चांगदेवाचे तपस्थळ चांगदेव येथे आजपासून ( ६ मार्च बुधवार ) माघवारी महायात्रेस सुरुवात होणार आहे. बुधवारपासून मुक्ताईनगर सह कोथळी, मेहून, चांगदेव परिसर टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुम जाणार आहे.
संत मुक्ताई व चांगदेव या गुरूशिष्याचे अतूट स्नेहाचे प्रतिक म्हणून परंपरेने चालत आलेल्या माघ वारी महाशिवरात्री यात्रौत्सवास गुरुवारी सकाळी सात मार्च रोजी श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथे मुक्ताई मंदिरात मुक्ताई चा अभिषेक, महापूजा, कलशपुजन होणार आहे.
संत मुक्ताई ची यात्रा 7 मार्च भागवत एकादशी ला असून यावर्षी दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ मार्च रोजी महाशिवरात्र आल्याने मोठी गर्दी होणार आहे. यावर्षी एकादशी व महाशिवरात्री लागोपाठ आल्याने मुक्ताईनगर , कोथळी, मेहून, चांगदेव मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असेल. महाशिवरात्रीपर्यंत चालणार्या यात्रौत्सवास विदर्भ , मराठवाडा , खान्देशासह, मध्यप्रदेशातुन हजारो वारकरी पायी दिंडीने चांगदेव मुक्ताई दर्शनाला येतात. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव,चिखली,भानगुरे, निमखेडी, खामखेडे ,सातोड, रूईखेडे , ईच्छापूर , वरणगाव , तळवेल आदी अनेक गावात दिंड्या अखेरचा मुक्कामाला आहेत. बुधवारी सकाळपासुन मुक्ताईनगरीत दिंड्यांचे आगमन होईल . झेंडूजी महाराज बेळीकर, गोमाजी महाराज नागझरी, गजानन महाराज शेगाव, रुक्मिणी माता कौडण्यपूर, सखाराम महाराज सखारामपूर, भोजने महाराज अटाळीकर , सोनाजी महाराज सोनाळा ,रूपराव महाराज, पंढरीनाथ महाराज या प्रमुख दिंडीपालख्या सह 200 वर दिंडी चे आगमन होणार असून प्रत्येक दिंडी फडावर भक्तीचा जागर चालेल. एकादशीनिमित्त नगर परिक्रमा व महाशिवरात्रीस मुक्ताई समवेत चांगदेवाचे दर्शनाला जातील. दि. १० ला पारणेसोडून वारकरी माघारी परततील.
मुक्ताई संस्थान कोथळी मुक्ताईनगर वतीने भाविकांना फराळ महाप्रसाद वाटपाचे नियोजन केले आहे . भाविकांना मुखदर्शन ह्यावेळी थेट गाभार्यात जवळून मिळण्याची व्यवस्था केलेली आहे .
कोथळीकडे वाहनाने येणारे भाविकांनी गजानन महाराज मंदिराकडील रस्त्यावर आस्था नगरीत व नविन कोथळीतुन येताना शेतात वाहनतळ व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांनी रस्त्यावर वाहने न लावता पार्किंग मध्येच लावावी जेणेकरून आपलीच गैरसोय होणार नाही. असे आवाहन संस्थानकडुन करण्यात आलेले आहे .वाहनतळ वरून नविनमुक्ताई मंदीर ते चांगदेव मंदीर अशी बसफेरी सोडण्यात येणार आहे. यात्रा सोहळा काळात मुक्ताईनगर आगार तर्फे यात्रेत सोडणाऱ्या बसेस वर मुक्ताई यात्रा उत्सव असे स्टिकर लावण्यात आलेले आहेत. यात्रा कालावधीत पुरेसा पोलीस बंदोबस्त दिलेला असून भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नियमाचे पालन करून वारीचा आनंद घ्यावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.


