भुसावळ, ता. २५ : येथील उत्कर्ष कलाविष्कार तर्फे येत्या एक मार्च पासून आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या खान्देश नाट्य महोत्सवात सात दर्जेदार नाटकांची रसिकांना विनामूल्य मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवा अंतर्गतच उद्या (ता. २६) ‘ शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवा संदर्भात अधिक माहिती देताना कोष्टी म्हणाले २०१० पासुन नानासाहेब देविदास फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणची नाटक स्थानिक रसिकांना पाहता यावी. नाटकातील नवे विषय, नवे तंत्र व नवे प्रयोग समजुन घेऊन जास्तीत जास्त नाट्य रसिक निर्माण व्हावे तसेच स्थानिक कलावंतांना देखील संधी मिळावी हा या महोत्सवाच्या आयोजनात मागील उद्देश आहे. आता पर्यंत ८० नाटकांचे सादरीकरण यात झाले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक व कल्याण येथील कलावंतांनी नाटक सादर केली आहेत. यंदा ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत हा महोत्सव एक ते तीन मार्च असा तीन दिवस श्री कृष्णचंद्र सभागृहात होणार आहे. महोत्सव परीसराला नाटककार नाटककार राहुल बनसोडे नाट्यपरिसर नाव देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता ओबेनॉल केमिकल प्रा. लि. चे संचालक अश्विनीकुमार परदेशी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक असतील तर आमदार संजय सावकारे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, महेश फालक, सुरेश पाटील, सुनील जैन, विलास चौधरी, डॉ. विनायक महाजन पंडितराव सुरवाडे, महेंद्र मांडे, प्रमोद धनकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पहिल्या सत्रात घाटे स्कुलचे विद्यार्थी ‘वारी’ हे बालनाट्य, उत्कर्ष कलाविष्कारचे ‘सेल नसलेला रेडिओ ‘ ही एकांकिका सादर होईल. तर सायंकाळच्या सत्रात पुणे येथील आजकल या संस्थेचे ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ व नाशिकच्या स पा न या संस्थेचे ‘तो राजहंस एक’ हे नाटक सादर होईल. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी देखील दर्जेदार नाटकांची मेजवानी असुन ही नाटके रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. महोत्सवात जिल्ह्यातील दहा नामवंत छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व नाट्य परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कोष्टी यांनी दिली. पत्रकार परिषदेला सुशील पाटील, प्रा. विलास सोळुंके, राजपालसिंग राजपूत उपस्थित होते.
‘आजच्या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ विषयी….
खान्देश नाट्य महोत्सवा अंतर्गत सोमवारी (ता. २६) नाहाटा महाविद्यालयात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या विषयी माहिती देतांना कोष्टी म्हणाले आपल्या खान्देशातील कलावंतांनी तयार केलेल्या पुरस्कार प्राप्त शॉर्ट फिल्म या फेस्टिव्हलमध्ये पाहता येणार आहे. यात स्वप्निल कापुरे हे पारोळा तालुक्यातील रहिवासी आहेत राष्ट्रपती पदक प्राप्त पुरस्कार दिग्दर्शक आहेत त्यांनी एफ टी आय आय या संस्थेच्या माध्यमातून बनवलेल्या ‘भर दुपारी’या शॉर्ट फिल्मला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याच फिल्मला पुरस्कार मिळालेला आहे. सोबतच त्यांनी एफ टी आय आय या संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शित केलेली ‘सत्यवान’ ही एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे. या शॉर्ट फिल्मलाही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
दुसरे दिग्दर्शक लक्ष्मीकांत सुतार. यावल तालुक्यातील पाडळसे या गावचे ते रहिवासी असून हल्ली पुणे व जर्मनी अशा दोन ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं फिल्म इंडस्ट्रीचा त्यांचा अनुभव आणि त्यांनी बनवलेल्या शॉर्ट फिल्म या चर्चेचा विषय ठरला असून त्यांच्या ‘अलर्ट बा’ व ‘नवाज’ या दोन शॉर्ट फिल्म यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत यांचा ही समावेश या महोत्सवात आहे. तिसरी दिग्दर्शक मिलिंद विसपुते हल्ली ते मुंबई येथे व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहेत अनेक सिरीयल आणि सिनेमासाठी ते छायाचित्रण करतात सोबतच त्यांनी बनवलेल्या ‘सिलवट’ या शॉर्ट फिल्मला अनेक फेस्टिवल मध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांचा ‘विभक्ती’ नावाची शॉर्ट फिल्म या सोहळ्यात दाखवली जाणार आहे सोबतच नवीन येणाऱ्या ‘पैलवान धाबा’ सिरीयलचा प्रोमो दाखवला जाणार आहे.
चौथी दिग्दर्शक आहे राजू शेख हे भुसावळ येथील रहिवासी असून यांनी तीन शॉर्ट फिल्म आणि जवळपास पाच ते सहा रॅप सॉंग दिग्दर्शित केले आहे.
या सर्व दिग्दर्शकांचा शॉर्ट फिल्म फेस्टिवल च्या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे या फेस्टिवल चे महत्व म्हणजे यात उत्कर्ष कलाविष्कार आणि आसपासच्या परिसरातील लोकांनी काम केलेली आहेत खानदेशातील हा दृकश्राव्य माध्यमाचा भाग अद्याप अनेक लोकांपर्यंत पोहोचलेला नाही तो पोहोचावा इथे देखील प्रतिभावंत चित्रकर्ती आहेत त्यांची ओळख व्हावी म्हणून या शॉर्ट फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात आलेले आहे. असे कोष्टी म्हणाले.


