भुसावळातील तापी पुलावर हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात वंचित आघाडीतर्फे चक्काजाम’ : तापी पुलावर आंदोलनाने वाहतूक ठप्प :

‘भुसावळ : हिट अ‍ॅण्ड रन कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी भुसावळातील तापी नदी पुलावर वंचित बहुजन आघाडीतर्फे सोमवारी दुपारी अचानक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. यावेळी काळ्या कायद्याविरोधात उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी यावलचे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वंचित आघाडीने सोमवारी दुपारी 12 वाजेनंतर असंख्य वाहनचालकांना सोबत घेत आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे भुसावळसह यावल व रावेरकडे जाणार्‍या वाहनांची कोंडी झाली तर सुमारे तासभर आंदोलन सुरूच राहिल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. सरकारने पारीत केलेला हिट अ‍ॅण्ड रन हा कायदा पूर्णपणे एकतर्फी असून वाहन चालकावर अन्याय करणारा आहे. या कायद्यामुळे देशभरातील वाहन चालकांवर अन्याय होणार असून त्यांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. काळा कायदा त्वरीत रद्द करण्याची मागणी वाहन चालकांसह वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली.
आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी केले. याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव योगेश तायडे, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान मुल्लाजी, युवा जिल्हा उपाध्यक्ष युनूस तडवी, जिल्हा संघटक बबन कांबळे, गणेश इंगळे, दीपक वाघ यांच्यासह जिल्हाभरातील वाहन चालक-मालक संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी यावलचे नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले. फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला.