कॅफेत असभ्य वर्तन, चार लैला मजनू पोलिसांच्या ताब्यात

मलकापूर –
मलकापूर शहरातील बोरले कॉम्प्लेक्स मधील रॉयल कॅफे मध्ये चार लैला – मजनु अश्लिल चाळे करतांना आढळून आल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर योग्य ती कारवाई करीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकाराने मलकापूर शहरात खळबळ उडाली असून शहरातील अवैध धंद्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर शहरातील बोरले शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील रॉयल कॅफेमध्ये काही मुले – मुली अश्लिल चाळे करीत असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली . त्यानुसार त्यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून रॉयल कॅफे मध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी संकेत सोपान नारखेडे ( वय २२, रा. दाताळा ), विजय जनार्दन बोचरे ( वय – २४, रा. घिर्णी ), शिवराज गजानन सोनुने ( वय – १८ रा .शिवाजी नगर मलकापुर ) आदित्य जनार्दन वानखेडे ( वय – १९ रा . गाडेगाव मोहल्ला , मलकापूर अशा चार मजनुंना आपल्या मैत्रिणी सोबत अश्लिल चाळे करताना पकडले व त्यांचेवर कलम ११०, ११७ प्रमाणे कारवाई करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले . तर या प्रकारामुळे शहरातील कॅफे चालकांचा गोरख धंदा समोर आला असून सदरहु कॅफे चालक हा अशा लैला – मजनुकडून ५०० रुपये वसुल करीत असल्याची चर्चा आहे . तसेच पोलीसांनी शहरातील अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यां विरुद्ध वॉश आऊट मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे .

पोलीसांचे आवाहन
मलकापुर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पाटील यांनी कॅफे चालकांना आपल्या कॅफेमध्ये अल्पवयीन मुले – मुली यांना प्रवेश देवु नये तसेच इतर येणाऱ्या संशयतांची नावे रजिष्टर मध्ये नोंद करून कॅफेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे असे आवाहन केले आहे .