दिलीप जोनवाल खून प्रकरण : २४ वर्षानंतर घेतला मुलाने वडिलांच्या खुनाचा बदला :


भुसावळ : शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात एकीकडे दसरा सणाचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे जुन्या वादातून शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल जोनवाल (५३, रा.महात्मा फुले नगर) यांची डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृृण हत्या करण्यात आल्याची घटना शहर पोलिस ठाणे हद्दीतील गरूड प्लॉट भागातील क्रांती चौकात मंगळवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जोनवाल सह अन्य यांनी दस्तगिर खाटीक खून केला होता व ‘त्या’ प्रकरणात मयताच्या मुलानेच वडिलांच्या खुनाचा बदला घेतल्याचे समोर आले आहे. चाकू हल्ल्यात एक आरोपी जखमी असून दुसर्‍याला अटक करण्यात आली.
भुसावळ शहरातील गवळीवाडा भागातील दस्तगीर गफूर खाटीक यांची १९९९ मध्ये दिलीप जोनवालसह अन्य संशयीतांनी हत्या केली होती. खून प्रकरणात जोनवाल यांच्यावर कारवाई देखील झाली होती मात्र वडिलांची हत्या करणार्‍यास कायमचा धडा शिकवण्यासाठी मयत दस्तगीर खाटीक यांचा मुलगा आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) व मयताचा पुतण्या साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) हे आगीत जळत होते. मंगळवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल हे अकलूद येथून जेवण करून गरूड प्लॉट भागात येत असताना संशयितांनी त्यांचा रस्ता अडवत त्यांना सुरूवातीला बेदम मारहाण केली तसेच लोखंडी पाईपाने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होवून जोनवाल यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रतिहल्ल्यात संशयित अदिल खाटीक जखमी झाला असून साजीदला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गरूड प्लॉट भागात अज्ञाताची हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याची माहिती कळताच भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. काही वेळेतच जोनवाल यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.

दिलीप जोनवाल यांच्या खून प्रकरणी त्यांचा मुलगा संग्राम दिलीप जोनवाल (२३, महात्मा फुले नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) व साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १९९९ मध्ये दस्तगीर गफूर खाटीक याचा दिलीप जोनवाल यांनी खून केल्याने त्या रागातूनच संशयित अदिल व साजीद यांनी डोक्यात लोखंडी पाईप मारून ही हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत. साजीद खाटीक यास अटक करण्यात आली आहे.