मौजे गोंभी येथील ‘ती’ फेरफार नोंद नामंजूर भुसावळ नायब तहसीलदरांचे आदेश


भुसावळ – मौजे गोंभी येथील फेरफार नोंद प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी तलाठी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. याबाबत नायब तहसीलदर अंगद असटकर यांच्याकडे सुनावणी झाली असता मौजे गोंभी येथील फेरफार नोंद क्र.1358 नामंजूर करण्यात आल्याचे आदेश त्यांनी दिले.
याबाबत माहिती अशी की, बाळू दौलत पाटील, मुकूंदा दौलत पाटील, सुधाकर दौलत पाटील, संतोष दौलत पाटील यांच्याकडून डॉ. स्वप्नील राजाराम कोळंबे यांनी गोंभी शिवारातील गट नं. 74/1 दस्त क्र. 3532/2023 नुसार खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविले होते. परंतु सदरची जागा ही वर्ग 2ची असल्यामुळे त्यामध्ये तहसीलदार यांची खरेदी विक्रीसाठी (32 एम) पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने सदरचा व्यवहार हा बेकायदेशीर असल्याने सदरच्या खरेदीखता अन्वये नोंद घेवू नये अशी हरकत सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी घेतली. त्याअनुषंगाने नायब तहसीलदर अंगद असटकर यांच्याकडे सुनावणी झाली असता आदेशामध्ये अर्जदार यांचा अर्ज 11/8/2023 रोजीचा अर्ज मंजुर करण्यात आला. व मौजे गोंभी येथील फेरफार नोंद क्र.1358 नामंजूर करण्यात आली असा आदेश 9/10/2023 रोजी नायब तहसीलदार यांनी दिला.
या प्रकरणी बाळू दौलत पाटील, मुकूंदा दौलत पाटील, सुधाकर दौलत पाटील, संतोष दौलत पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. किशोर राजूपत व डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश फेगडे यांनी कामकाज पाहिले तर केदार सानप यांनी स्वतः आपली बाजू मांडली.