मुंबई / प्रतिनिधी –
पत्रकार विशाल राजे लिखित ‘को – यात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन अलिबाग येथे नुकतेच करण्यात आले. कौटुंबिक आणि स्नेहीजनांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी होते. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे, डॉ. किर्ती साठ्ये आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उपाध्यक्ष फुलगावकर बाई व्यासपीठावर उपस्थित होते.
कोविडच्या महामारीत आलेले अनुभव, रुग्णालयातील भीतीदायक वातावरण आणि मृत्यूशय्येवर सुरु असलेला जीवन प्रवास विशाल राजे यांनी या पुस्तकातून उलगडला आहे. या लिखाणात कुठेही कोणाबद्दलही कटुता जाणवत नाही, मात्र पत्रकार म्हणून त्यांनी टिपलेले अनुभव यंत्रणेला दखल घ्यायला भाग पाडतील. कोविडच्या काळातील अनुभव अत्यंत साध्या आणि ओघवत्या शैलीत त्यांनी मांडले असल्याचे यदु जोशी म्हणाले.
संघर्षाच्या काळात आपली वर्तणूक, विचार प्रक्रिया आपण कशी निकोप, निरोगी आणि पूर्वग्रहदूषित न ठेवता समाजभान जपतो, त्यावर आपले व्यक्तिमत्व ठरते. अनेकांनी या संकट काळात मदतीसाठी धावून जाताना आपल्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांचाही उल्लेख ‘को – यात्री’ मध्ये असल्याचे बघून समाधान वाटले. प्रत्येक वाचक आपल्या अनुभवांचा संदर्भ या पुस्तकात शोधू शकतो, असा विश्वास यावेळी रघुजी राजे आंग्रे यांनी व्यक्त केला. यावेळी कोविड काळात उल्लेखनीय कार्य केलेले नगरसेवक अनिल चोपडा, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, निमिष परमार, डॉ, तन्वी भट आदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. श्रुती राजे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तर कोणाचेही आभार न मानता कोविड काळात मदत केलेल्या सगळ्यांच्या ऋणात राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या भावस्पर्शी पुस्तकाची छपाई जळगावच्या कृपा प्रकाशनने केली आहे.



