विद्यार्थ्याची शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली : शाळेच्या प्रांगणात आली भोवळ : डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम शाळेतील घटना :

भुसावळ : उन्हाळी सुटीनंतर सीबीएसई पॅटर्नच्या शाळां सोमवार, १२ जून रोजी पासून सुरू झाल्या . त्यानुसार येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये पहिल्याच दिवशी शाळेच्या प्रांगणात आलेल्या आठवीच्या विद्यार्थ्याला भोवळ आली व त्यानंतर त्याचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, या विद्यार्थ्याला हायपर टेंशन, उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. शाळेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली तर शिक्षकवर्गातूनही या प्रकाराविषयी हळहळ व्यक्त करण्यात आली.
शहरात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल असून या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात सुयोग भुषण बडगुजर (भुसावळ) हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सोमवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थी सकाळीच शाळेत दाखल झाला मात्र शाळेच्या आवारात आल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास त्याने मळमळ होत असल्याचे सहकारी मित्रांना सांगितले व त्याचवेळी त्याला भोवळ आली व तो खाली कोसळला. शाळेतील शिपाई व कर्मचार्‍यांनी त्याला उठविण्याचे प्रयत्न करूनही हालचाल होत नसल्याने पालकांना माहिती कळवण्यात आली व तत्काळ चारचाकी वाहनाद्वारे शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तेथे व्हेन्टीलेटर नसल्याने तेथून डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे आणण्यात आले. विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले मात्र व्हेन्टीलेटर सुरू होत नाही तोच विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली. इलेक्ट्रीक सीपीआर देवूनही उपयोग झाला नाही.
मयत विद्यार्थी सुयोग हा सुमारे दोन महिन्यांपासून हायपर टेंन्शन, उच्चरक्तदाबाने त्रस्त होता. जळगावात दोन डॉक्टरांकडे त्याची तपासणी व कलर डॉपलर व विविध चाचण्या करण्यात आल्या व गुरुवार, १५ जून रोजी पुणे येथे सह्याद्री हॉस्पीटलमध्ये त्यास तपासणीसाठी नेण्याचे कुटूंबियांचे नियोजन होते मात्र त्यापूर्वीच क्रुर काळाने त्याच्यावर घाला घातला. मयत विद्यार्थी हा परीवारातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटूंबाने मन हेलावणारा आक्रोश केला. मयत विद्यार्थ्याच्या पश्चात आई, लहान बहिण, दोन आत्या, मामा असा परीवार आहे. दरम्यान, मयत सुयोगचे वडील भूषण प्रभाकर बडगुजर यांचे सुमारे नऊ महिन्यांपूर्वीच सेवेत असताना हृदयविकाराने निधन झाले आहे. आधी वडिलांचा व नंतर मुलाचा अकाली मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान तापीनदी परीसरात शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.