डॉक्टर धावपटूंनी दिले सीपीआर उपचार पद्धतीचे धडे: महिला धावपटूंना सराव सत्रात मार्गदर्शन” :


भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 12 मार्च रोजी महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत 300 हून अधिक महिलांनी नावनोंदणी केली असून 26 फेब्रुवारी नाव नोंदणीचा अंतिम दिवस असणार आहे. स्पर्धकांसाठी दर मंगळवार, गुरुवार व रविवार असे तीन दिवस सराव सत्राचे देखील आयोजन सुरू आहे.
सराव सत्रानंतर यावेळी डॉ संज्योत पाटील व डॉ. अनिता भिरूड यांनी महिला स्पर्धकांना सीपीआर या उपचार पद्धती विषयी माहिती सांगितली व प्रत्येक धावपटूसाठी त्याचे महत्त्व अधोरेखित केले.

सीपीआर म्हणजेच कार्डिओ रेस्पिरेटरीरी रिससेटेशन. ज्या वेळी अचानक ह्रदय बंद पडते व व्यक्ती बेशुद्ध पडते, नाडी लागत नाही अशावेळी डॉक्टर अथवा इतर वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी सीपीआर उपचार पद्धती अवलंबिली जाते. अशावेळी रुग्णाच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब दिला जातो. त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरू होण्यास मदत होते. यासाठी कुठलेही औषध व इंजेक्शनची गरज नसते. सामान्य व्यक्ती रुग्णाचे प्राण वाचवू शकतो.
यावेळी कृत्रिम मानवी शरीरावर काही महिला धावपटूंनी सीपीआर पद्धतीचे प्रात्यक्षिके देखील केले. धावताना बऱ्याचदा अशा अप्रिय घटना घडतात त्यामुळे डॉक्टर लागलीच उपलब्ध होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे सहकारी धावपटूंनी न घाबरता रुग्णाचे प्राण सीपीआर द्वारे वाचवावे असे प्रतिपादन डॉ. संज्योत पाटील व डॉ. अनिता भिरूड यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. नीलिमा नेहेते, डॉ. चारूलता पाटील ,पुष्पा वंजारी ,ममता ठाकूर, हर्षा लोखंडे ,मीना नेरकर, स्वाती फालक ,पुनम भंगाळे, किरण गोंठला, नीलांबरी शिंदे , डॉ वर्षा वाडिले, माधुरी चौधरी, माया पवार ,मोनिका देशमुख ,सरला पाटील ,नीतू जयस्वार, आरती चौधरी, सोनाली वारके ,दीपा स्वामी ,ज्योती सिंग ,रिया कोलाडकर ,चंदना वारके या महिला धावपटू उपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण पाटील यांनी मानले .चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल प्रवीण फालक यांनी समाधान व्यक्त केले.