भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ–बडनेरा रेल्वे मार्गावर माना–मूर्तिजापूर स्थानकांदरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवर नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या तीन रेल्वे गाड्यांच्या संचालनात बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कामामुळे पुढील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल पुढीलप्रमाणे : 1\. गाडी क्रमांक २०६२५ चेन्नई–भगत की कोठी एक्सप्रेस ही गाडी कुरुम स्थानकावर एक तास नियंत्रित करण्यात येणार आहे. 2\. गाडी क्रमांक २६१०२ अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी अजनी स्थानकावरून निर्धारित वेळेपेक्षा १ तास ५५ मिनिटे उशिराने रवाना होणार आहे. 3\. गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा–भुसावळ मेमू ही गाडी बडनेरा स्थानकावरून नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुटणार आहे. ### सुरक्षित रेल्वे संचालनासाठी काम रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधांची देखभाल, आधुनिकीकरण आणि सुरक्षित रेल्वे संचालनाच्या दृष्टीने अशा प्रकारचे देखभाल ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रवाशांनी रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकातील बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गाड्यांच्या अद्ययावत वेळा व अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.



