भुसावळकरांचा अभिमान : श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रवीण कुमार पाठक याचे तुर्कस्तान भीषण आपत्ति दरम्यान मदतीसाठी भरीव सहभाग .

भुसावळ – मागील काही दिवसांत तुर्कीमध्ये एकापाठोपाठ एक अनेक भूकंप आले आहेत आणि आणि आतापर्यंत शेकडो आफ्टरशॉक बसले आहेत. ह्या भूकंपामुळे तुर्कस्तान मध्ये मोठा विध्वंस झाला असून ह्या विध्वंसात हजारो लोक मृत्यूमुखी पडले असून लाखों लोक जखमी व बेघर झाले आहेत. भूकंपामुळे वाताहत झालेल्या आणि निर्नायकी अवस्थेला तोंड देत असलेल्या तुर्कस्तानच्या मदतीसाठी भारताने वैद्यकीय पथकासह एनडीआरएफचं पथक भूकंपग्रस्त भागात वैद्यकीय मदत, आपत्ति व्यवस्थापन आणि पुनर्वसनाच्या मदतीसाठी रवाना केले होते. भारताच्या ह्या पथकांनी जी कामगिरी बजावली तिचे आज जगभरात कौतुक होत आहे.
आपल्या भुसावळकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा माजी विद्यार्थी प्रवीण कुमार पाठक हा सुद्धा ह्या आपत्ति व्यवस्थापन आणि पुनर्वसन पथकात सामील होता आणि तुर्कस्तान वरील भीषण आपत्ति दरम्यान मदतीसाठी भारत सरकारच्या मानवतावादी कार्यात आपला भरीव सहभाग नोंदवला. गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रवीणहज कुमार पाठक हा एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये वाराणसी येथे कार्यरत आहे. वाराणसी येथून तुर्कस्थानला रवाना झालेल्या पथकाचा प्रवीण कुमार पाठक हा सदस्य होता. मदत कार्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या पथकाशी संवाद साधत त्यांचे विशेष कौतुक केले.
“तुर्कस्तानमधील परिस्थिति भीषण असून त्या देशात महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. परिसरातील तीन विमानतळांचेही नुकसान झाले आहे. मृत्यूच्या ह्या तांडवादारम्यान अनेक माणसे, माता भगिनी, छोटी बाळे आणि मूल इमारतींच्या ढीगाऱ्याखाली दाबली गेली होती. अश्या लोकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित जागी पोहचवणे, त्यांना अन्न पुरवठा करणे इत्यादी बचाव कार्यात आम्ही गुंतलो होतो” असे गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रवीण कुमार पाठक याने सांगितले. ह्या परिस्थितीला सामोरे जाणे सोपे नसल्याचे नमूद करतांना प्रवीण कुमार पाठक याने सांगितले कि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने जो तुर्कस्तानच्या मदतीचा निर्णय घेतला त्याने संपूर्ण जगात भारताचा मान प्रचंड वाढला असून भारताच्या मानवतावादी दृष्टिकोणाची सगळ्या जगाला दखल घ्यावी लागली आहे.
NDRF चे घोषवाक्य “आपदा सेवा सदैव” आणि राष्ट्रसंत श्री. गाडगेबाबांचे समाजाला आपण काही देणे लागतो हे महाविद्यालयात शिकतांना कोरले गेलेले संस्कार ह्यामुळे हे कार्य शक्य झाल्याचे प्रवीण कुमार पाठक याने सांगितले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेला संवाद आयुष्यभर विसरू शकणार नसल्याची भावना मांडली.
तांत्रिक ज्ञानाबरोबरच माणुसकीच्या भावना जोपासत सामाजिक प्रश्नांची सुद्धा सशक्त जाणीव असणारे अभियंते घडविण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो आणि प्रवीण कुमार पाठक याच्या मानवतावादी कार्यामधील सहभाग हे त्याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी केले.
मानवतेच्या कार्यात सहभागी असलेल्या माजी विद्यार्थ्याचा सार्थ अभिमान असल्याची भावना विभागप्रमुख डॉ.पंकज भंगाळे, प्रा. प्रफुल्ल वानखेडे, प्रा. पंकज अत्तरदे, प्रा. मनीष माटा यांनी व्यक्त केली.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ..ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील यांनी तसेच इतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.