यावलसह बर्‍हाणपूरातील दुचाकी चोरटा जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात –

जळगाव : दुचाकी चोरी प्रकरणी दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एमआयडीसी ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सुरेश सपकाळे (23, मालोद, ता.यावल) आणि अजीमउद्दीन नजीमउद्दीन (30, रा.चित्रा टॉकीज, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 773/22 नुसार दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्याकडे होता. एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नितीन सुरेश सपकाळे आणि अजीमउद्दीन नसीरउद्दीन या दोघांना वेगवेगळ्या भागातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 75 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या संदर्भात शनिवार, 28 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, किरण पाटील यांनी कारवाई केली. तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.