भुसावळ : शहरातील खडका एमआयडीसीतील एका कंपनीतील बायोडिझेल तयार केले जात असल्याच्या संशयातून डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी रविवारी कंपनीत धडक देत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी कामगारांना खोलवर विचारणा केल्यानंतरही त्यांच्याकडून माहिती न मिळाल्याने दोन कामगारांना ताब्यात घेण्यात आले असून पुरवठा विभागाच्या अभिप्रायानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाणार आहे

तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल पवार, हवालदार युनूस शेख व अन्य पोलीस कर्मचारी तसेच आरसीपी प्लॉटूनने खडका एमआयडीसीतील लक्ष्मी एंटरप्राईजेस या कंपनीत धडक दिली मात्र कंपनीतील कर्मचारीवर्गाकडून नेमकी कुठलीही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. कंपनीचे मालक हे गुजरातमध्ये वास्तव्याला असल्याचे कळाल्यानंतर त्यांना फोन लावण्यात आला मात्र संपर्क होवू न शकल्याने पोलिसांनी ज्वलनशील द्रवांचे नमूने बाटलीत भरून घेतले तसेच कंपनीतील दोन कामगारांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. कंपनीच्या आवारात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे पुरवठा अधिकार्यांच्या उपस्थितीत पुन्हा नमूने घेण्यात येणार असून त्यानंतर पोलीस पुढील कारवाईची दिशा ठरवणार आहेत.
.


