भुसावळ – ‘वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमात गुणवंत धावपटू व सायकलपटूंचा सन्मान’
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंचे कार्य गौरवास्पद असून ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी उद्याचे धावदूत आहेत असे गौरवोद्गार सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी काढले. 150 हून अधिक धावपटू भुसावळ सारख्या लहान शहरात एकत्र धावतात याचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते डॉ. नीलिमा नेहेते, सीमा पाटील, दीपा स्वामी, उमेश घुले, संजय भदाणे या गुणवंत धावपटूंचा तर विद्याधर इंगळे या गुणवंत सायकलपटूचा सत्कार करण्यात आला. शिवाय विजय फिरके यांनी हाफ आयर्नमॅनची स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल तर आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या योगा मास्टर लेव्हल -6 या परीक्षेत संपूर्ण देशात प्रथम आल्याबद्दल पूनम कुलकर्णी यांचा त्यांनी विशेष सत्कार केला. याप्रसंगी व्यासपीठावर जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष श्री किरण बच्छाव व भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. प्रवीण फालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भेल इंडिया लिमिटेडचे मुख्य प्रबंधक दिनेश जावडे, राधाकृष्ण प्रभात फेरीचे प्रणेते श्री राधेश्याम लाहोटी यांचे स्वागत प्रवीण वारके व गणसिंग पाटील यांनी केले. त्यानंतर डॉ. संदीप काटे यांचा भुसावळ रनर्सतर्फे प्रा प्रवीण फालक व डाॅ. तुषार पाटील यांनी विशेष सत्कार केला. याप्रसंगी त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल विशेष मानपत्र प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रवीण पाटील यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात डॉ. काटे यांनी साताऱ्याची मॅरेथॉन अल्पावधीत कशी लोकप्रिय झाली व भुसावळच्या धावपटूंनी त्यातून काय बोध घ्यावा यावर प्रकाश टाकला. त्याशिवाय नवीन व जुन्या धावपटूंनी काय काळजी घ्यावी, वेग महत्त्वाचा नसून आपले आरोग्य रनिंगमुळे सुदृढ करावे असा सल्ला देखील त्यांनी दिला.
त्यानंतर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन ही ट्रस्ट कशी स्थापन झाली याबद्दल माहिती देण्यात आली व सर्व उपस्थित ट्रस्टींचे टाळ्यांच्या गजरात सर्वांनी अभिनंदन केले. त्यानंतर ‘बीसारा लेडीज इक्वलिटी रन’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व सहकार्य केल्याबद्दल डॉ. नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, पारुल वर्मा, आरती चौधरी, मंगला पाटील व योगेश पाटील या धावपटूंना देखील डॉ संदीप काटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रवीण फालक यांनी 11 लोकांपासून सुरू झालेला रनिंगचा प्रवास 150 वर पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त केले व शिस्तीशिवाय हे शक्य नसल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. चारुलता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण वारके, गणसिंग पाटील, डॉ. वर्षा वाडीले, प्रशांत वंजारी, आनंद सपकाळे यांनी सहकार्य केले.



