भुसावळ : सूर निरागस हो नमन गणेशा, प्रभाती सूर नभी रंगती, उठी उठी गोपाळा, उठी श्रीरामा, घन:श्याम सुंदरा अशा एकापेक्षा एक सुरेल गीतांचे सादरीकरण भुसावळ येथील विकास कॉलनीतील साई चौकात पार पडलेल्या तेजोमय नादब्रह्म कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्वरचैतन्याने बहरून टाकणारा स्वरमहोत्सव म्हणजे अर्थातच तेजोमय नादब्रह्म दिवाळी पहाट. विकास कॉलनीत प्रथमच असा कार्यक्रम पार पडल्याने महिला व पुरूषांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.

दिवाळी म्हणजेच दिव्यांचा हा आनंदोत्सव, मात्र गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रभाव होता. यंदा मात्र महामारीचे काळे ढग नाहीसे होऊन स्वराभिषेकासाठी आभाळ मोकळे झाल्याने यंदाची दिवाळी उत्साहात पार पाडण्यासाठी भुसावळ येथील विकास कॉलनीतील साई चौक मित्र मंडळातर्फे दिवाळी पाडवा पहाट तेजोमय नादब्रह्म ही संगीतमय मैफिल कलाकारांनी साजरी केली. पहाटे साडेपाच वाजता कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रारंभी श्री गणरायाच्या मूर्तीला योगगुरू महानंदा पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी बी.एल. पाटील, प्राचार्य जयश्री भंगाळे, नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, आर.एल. पवार, सामाजिक कार्यकर्ते रूपेश देशमुख, डॉ.छाया फालक (देशमुख), लखन देशमुख, संजयसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख गायक व निवेदक किरण सोहळे यांच्यासह गायक वरूण नेवे, गायक कु.भाग्यश्री भंगाळे, हार्मोनियम वादक गणेश देसले, व तबला वादक सुयोग गुरव यांनी साथसंगत केली.
भुसावळकर श्रोते झाले मंत्रमुग्ध
लक्ष दिप हे, देव देव्हार्यात नाही, आकाशी झेप घेरे, फिरत्या चाकावरती देसी, भक्ती वाचून मुक्तीची, निजरूप दाखवा हो, झाला महार पंढरीनाथ, रूणझुणु रे भ्रमरा, उंबरठ्यासी कैसे शिवु, काळ देहासी आला खाऊ, पुंडलिक आहे बंधू, ओंकार अनादी अनंत, दीपावली मनाई सुहानी, झुंजु मुंजू पहाट झाली, या जन्मावर शतदा, आम्ही ठाकरं, वल्हव रे नाकवा, दही दूध लोणी, हे सुरांनो चंद्र व्हा, जयोस्तुते अंदाज आरशाचा, बाजे मुरलियाँ, गोंधळ, भारूड, भैरवी जगत जननी, हेची दान देगा देवा अशा नानाविध गीतांनी दोन तास श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन श्रवण करीत होते. भारूड व गोंधळाच्या वेळी गणेश देसले यांच्या संबळ वादनावर अनेक जण थिरकले. परीसरातील शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. अगदी भुपाळीपासून प्रारंभ होत भक्तीगीत, भावगीत, भजन, चौपाल, चित्रपट गीते, भारूडासह भैरवीने सांगता करण्यात आली. कलाकारांनी एकापेक्षा एक सदाबहार गीते तसेच गवळणी, भूपाळी, भावगीते सादर करून पहाटेच्या गारव्यात सुखद असा आनंद श्रोत्यांना दिला. निवेदक व गायक किरण सोहळे यांनी उत्कृष्ट निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. दर्जेदार स्थानिक कलाकारांची स्वरचैतन्याची स्वरमैफल तेजोमय नादब्रह्म मैफल रसिकांसाठी सुरेल मेजवानी ठरली. आभार मनीषा देशमुख यांनी मानले.


