भुसावळ : मुंबईतील मुलाचे अपहरण करून संशयीत त्यास रेल्वेद्वारे नेत असल्याची माहिती प्रवाशांनी सुरक्षा यंत्रणांना दिल्यानंतर संशयीतास अटक करण्यात आली तसेच पीडीत मुलाची मंगळवारी सायंकाळी सुटका करण्यात आली. सिध्दार्थकुमार ब्रिजेशकुमार (रा. संतवीर नगर, ठाणे) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

प्रवाशांनी माहिती देताच आवळल्या मुसक्या
मुंबई-छपरा एक्स्प्रेसने एका 14 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून संशयीत पसार होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला गाडीतील प्रवाशांनी मंगळवारी सायंकाळी दिल्यानंतर गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर येताच संशयीताला ताब्यात घेण्यात आले तसेच पीडीत बालकाची सुटका करण्यात आली.
ठाणे पोलिसांनी घेतला दोघांचा ताबा
प्रभारी निरीक्षक दयानंद यादव यांनी ठाणे येथील श्रीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे मुलास पळविल्याची नोंद केल्याचे सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी ठाणे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा बलाकडून संशयीत सिध्दार्थकुमार व लहान मुलगा नाहर उर्फ रोनक चव्हाण याचा ताबा घेतला.


