भुसावळातील दुर्गोत्सव मंडळांनी सिटीजन पोर्टलवर करावेत अर्ज : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे –

भुसावळ : आगामी आठवड्यात नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असून भुसावळ विभागातील मंडळांनी सिटीजन पोर्टलवर उत्सवाच्या परवानगीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे. ऑनलाईन अर्जाची छाननी करून त्या ठिकाणी संबंधित पोलिस स्टेशन त्याचप्रमाणे नगरपालिकेचे अधिकारी/ कर्मचारी प्रत्यक्ष भेट देऊन अर्जाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू करतील तसेच शनिवारपासून या प्रक्रियेला गती द्यावी, असेही वाघचौरे यांनी कळवले आहे.

अर्जाबाबत अडचण आल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधा
अर्जाबाबत कोणतीही अडचण असल्यास संबंधित पोलिस स्टेशनला भेट देण्याचे कळवण्यात आले. मंडळ पदाधिकार्‍यांनी ऑनलाईन अर्ज करताना -मंडळाची कार्यकारीणी, मूर्तीची उंची, विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, विसर्जन मिरवणुकी दरम्यान वापरले जाणारे वाहन, विसर्जन मिरवणुकी दरम्यान वापरले जाणारे वाद्य, उभारण्यात येणार्‍या स्टेजची लांबी, रुंदी, मंडळाचे स्वयंसेवक, उत्सव कालावधी दरम्यान आयोजित केला जाणारा कार्यक्रम आदी माहिती भरूनच अर्ज सादर केल्यास परवानगी प्रक्रिया तत्काळ सुलभ होईल, असे पोलिस उपअधीक्षकांनी कळवले आहे.