जळगाव – प्रतिनिधी
कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा संगीत महोत्सव होत आहे.स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या भव्य संगीत महोत्सवाचे आयोजन केले असून यात सर्व सहभागी कलावंत हे भाग्यवान आहेत ,तसेच जळगावाच्या इतिहासात हा कला उत्सव होत आहे ,आजचा दिवस अविस्मरणीय असून हा दिवस सुवर्णअक्षरात कोरला जाईल .दरवर्षी असा संगीत महोत्सव सुरू रहावा अशी अपेक्षा महापौर जयश्रीताई सुनील महाजन यांनी व्यक्त केली.
व.वा.वाचनालयाच्या नूतन सभागृहात आज संगीत महोत्सवाचे उदघाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते नटराज देवतेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.
जळगाव ही कलावंतांची भूमी आहे,हजारो विद्यार्थ्यांना जेष्ठ कलावंत मोहन तायडे यांनी घडविले असून संगीत महोत्सवात आलेल्या कलाकारांना शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी शुभेच्छा दिल्या.तुषार वाघुळदे यांनी सांगितले की,जिल्ह्यातील कलाकारांचे एकत्रीकरण या निमित्ताने होत आहे. ‘ न भूतो न भविष्यती ‘ असा हा कार्यक्रम आम्ही असोसिएशनतर्फे घेत आहोत. याप्रसंगी जेष्ठ कलावंत विजयकुमार कोसोदे म्हणाले ,महापौर ह्या स्वतः शिक्षिका आहेत, मातृत्वाची भावना तेवत ठेऊन कलाकार असोसिएशनला त्यांचे सहकार्य लाभले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.व्यासपीठावर ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष मोहन तायडे सचिव तुषार वाघुळदे ,दिलीप ( बापू ) पाटील,परीक्षक डॉ.अपर्णा भट ,कासार ,नरेश बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित ” महापौर संगीत महोत्सव “
आजपासून ( दि.13 ) सुरू झाला आहे. 15 ऑगस्टपर्यन्त हा महोत्सव सुरू राहणार आहे.भव्य-दिव्य स्वरूपात हा संगीत उत्सव साजरा होत आहे. आज लहान व मोठ्या गटातील नृत्य स्पर्धा झाल्यात.यासाठी जोरदार प्रतिसाद मिळाला.
जळगावकरांना नाविन्यपूर्ण उपक्रमाची मेजवानी मिळावी,त्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा ,रसिकांची गरज पूर्ण व्हावी ,यासाठी हा ” महापौर सांस्कृतिक महोत्सव ” घेण्यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
हा ऐतिहासिक संगीत व.वा.वाचनालय,रेल्वे स्टेशन रोड येथील नवीन सभागृहात होत आहे, सायंकाळी 7 वाजता ( ब्लॅक अँड व्हाईट ) चित्रपटातील गाण्यांचा बहारदार कार्यक्रम चांगलाच रंगला. उद्या दि.14 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता गीतगायन स्पर्धा खुला गट ( करावोके ) स्पर्धा होतील .याच दिवशी दि.14 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतरत्न गानकोकीळा स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजलीचा स्वरांजली हा कार्यक्रम होईल. तर
दि.15 ऑगस्ट सोमवारी सकाळी 11 वाजता ” आझादी का अमृत महोत्सव ” या कार्यक्रमाअंतर्गत देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम होईल.हा देखणा कार्यक्रम जळगाव येथील महाबळ कॉलनी रोडवरील छत्रपती राजे संभाजी नाट्यगृहात होईल.
या भव्य-दिव्य सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश, विदर्भ ,मराठवाडा आणि कोकण विभागातील अनेक कलावंत सहभागी होणार आहेत, ही आनंददायी बाब आहे , कार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे आणि प्रकाश लोडते यांनी तर आभार मोहन तायडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी दिलीप पाटील ,हाफिज खान ,शाम जगताप ,विवेक शिवरामे,प्रभाकर जाधव,लक्ष्मी नाटेकर ,रवी गोपाळ ,नरेश बागडे, संतोष ठाकूर,नाना कोळी,अनिल,अढंगी यांच्यासह पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.रसिक-श्रोत्यांनी या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा असेही आयोजकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.



