विमा एजंटच्या घरातून सव्वा कोटींची रोकड, 46 लाखांचे सोने, दस्तऐवज जप्त :


धुळे – येथील विमा एजंट (राजेंद्र बंब याच्यासह त्याच्या भावाच्या घरावर पाच पथकांनी एकाचवेळी छापा टाकला. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चौकशीत पोलिसांना मोठा मुद्देमाल व महत्त्वाचे दस्तावेज हाती लागले आहेत.
घरातून तब्बल सव्वा कोटींची रोकड, 46 लाखांचे 998 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अनेक आक्षेपार्ह दस्ताऐजव जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राजेंद्र जीवनलाल बंब (वय 49 रा.ग.नं.7, जुने धुळे) याच्याविरोधात काल आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव पोलीस उपअधीक्षक ईश्‍वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात अतिशय गुप्तता बाळगत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, असई हिरालाल ठाकरे, पोलीस हवलदार गयासुद्दीन शेख, भुषण जगताप, रविंद्र शिंपी, मनोज बावीस्कर व जिल्हयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी सपोनि दादासाहेब पाटील, सपोनि उमेश बोरसे, सपोनि मनोज ठाकरे, पोउनि अनिल महाजन, मपोउनि सुवर्णा महाजन आणि पोलीस अंमलदारांचे तसेच सावकारांचे सहायक निबंधक तथा उप-निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचे स्वतंत्र 5 छापा पथके तयार करण्यात आली.

याच पथकांनी एकाच वेळी छापा कारवाई केली. मुख्य आरोपी राजेंद बंब याच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला. काल दिवसभर व रात्रीउशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. चौकशीत गुन्हयाशी संबंधीत आक्षेपार्ह दस्तऐवज, सौदा पावती, गहाण खत, रोख रक्कम व सोन्याचे दागीने मिळून आले. त्यात पंचनामा कारवाईकरुन मुख्य आरोपी राजेंद्र बंब याच्या घरातून 1 कोटी 30 लाख 1 हजार 150 रुपये रोख व 46लाख 22 हजार 378 रुपयांचे 998.470 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तसेच आरोपीचा भाऊ संजय बंब याच्या घरातून गुन्हयाशी संबंधीत कागदपत्रे आणि 12 लाख 9 हजार 400 रुपये रोख असा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान राजेंद्र बंब याने कोणा कर्जदाराच्या मालमत्तेचे कागदपत्र गहाण अगर सौदा पावती करुन ठेवून घेतले असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या गुन्ह्यात आरोपींची संख्या देखील वाढणार आहे.