भुसावळ नगरपरिषद प्रारुप प्रभाग रचनेबाबतीत राज्य निवडणूक आयुक्तांकडे शिवसेनेचे निवेदन ;


,
भुसावळ – भुसावळ नगरपरिषद प्रारुप प्रभाग रचनेबाबतीत राज्य निवडणूक आयुक्तांकडे जळगाव जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी भुसावळ यांच्याकडे ३ हरकती दिनांक १४/०५/२०२२ रोजी सादर केल्या होत्या. दिनांक २१/०५/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे या हरकतींवर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी यांना भुसावळ नगरपरिषद अधिकाऱ्यांनी योग्य माहिती पुरवली नाही याची शंका वाटत आहे. कारण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२१. रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या परिपत्रक क्रमांक- रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.३/का-६. नुसार प्रारूप प्रभाग रचना नकाशा परिशिष्ट अ नुसार तयार केलेला नकाशाच या सुनावणी दरम्यान उपस्थित नव्हता. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ दरम्यान प्रगणक गट, नद्या, नाले व इतर बाबी दर्शवणारा नकाशा या ठिकाणी वापरण्यात आला. आता २०१६ प्रमाणे प्रारूप प्रभाग रचना नाही. अश्याच प्रकारचा नकाशा आयोगाच्या नियमानुसार या निवडणुकीसाठी तयार करणे आवश्यक होते कारण २०१६ च्या बदल्यात ९५ टक्के प्रारूप प्रभाग रचनेत बदल करण्यात आलेले आहेत. सुयोग्य नकाशा उपलब्ध नसल्याने सुनावणी दरम्यान अनेक अडचणी आल्यात म्हणून हा नकाशा पुन्हा तयार करावा असे निवेदन राज्य निवडणूक आयुक्तांना शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी दिले आहे.
राजकीय दबावापोटी प्रभाग क्रमांक ८ ची प्रारूप रचना करतांना ८० % नैसर्गिक नाल्याची सीमा वापरण्यात आली आहे. परंतु मरीमाता मंदिर, जुना सातारा परिसर नैसर्गिक नाल्याची सीमा ओलांडून प्रभागात सामील झालास कसा? हि संशोधनाची बाब आहे. प्रभाग ८ मध्ये सामील असलेला ५५८ लोकसंख्येचा प्रगणक गट १३२/०२ हा भाग प्रभाग ९ मध्ये सामील करावा. ज्याप्रमाणे नैसर्गिक नाल्याची सीमा ओलांडून ६८/०२ हा भाग प्रभाग ८ मध्ये सामील करण्यात आला आहे त्याच निकषावर प्रभाग ९ मध्ये १३२/०२ हा भाग सामील करावा. १३२/०२ हा भाग प्रभाग ९ मध्ये सामील झाल्यास प्रभाग ८ ची लोकसंख्या ७४०२ होईल व प्रभाग ९ ची लोकसंख्या ८०५५ होणार आहे. या हरकतींवर आयुक्तांनी लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय द्यावा अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल असे निवेदनात नमूद आहे.