भुसावळ झाेनल ट्रेनिंग सेंटर सौर ऊर्जेवर, वर्षभरात ५० लाखांच्या वीज बिलात बचत :

भुसावळ : देशभरात रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ होत आहे. मात्र, देशात ऊर्जानिर्मितीची जेमतेम स्थिती पाहता रेल्वे मंत्रालयाने जास्तीत जास्त कामकाज सौरऊर्जेवर नेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सहा वर्षांपासून भुसावळातील रेल्वेच्या झाेनल ट्रेनिंग सेंटरमध्ये (झेडआरटीआय) साैर ऊर्जेचा वापर सुरू आहे. यामुळे दरवर्षी विजबिलावर खर्च होणाऱ्या ५० लाख रुपयांची बचत होते. भुसावळातील हा प्रयोग यशस्वी झाल्याने रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेतील पाचही विभागांना ५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती व वापराचे उद्दिष्ट दिले आहे.

झेडआरटीआयमध्ये दरमहा सरासरी ५ लाख रुपये वीज बिल येत होते. या विजेची बचत करून संपूर्ण कामकाज सौरऊर्जेवर चालवण्याची संकल्पना २०१६मध्ये पुढे आली. त्यातूनच केंद्राच्या छतावर १९८२ सौरप्लेट बसवून ५०० केडब्ल्यूपी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला. या सौरऊर्जेतून प्रशासकीय इमारतीसह सात वसतिगृह, खानावळ, पंधरा बंगला कर्मचारी काॅलनी, रेल्वे कॉलनी, वातानुकूलीत यंत्रणा, १०० कुलर, संस्थेतील पंखे, दिवे, वॉटर गिझर चालवले जातात.
वर्षभरात ५ लाख ४८ हजार ५७६ युनिट निर्मिती
झाेनल ट्रेनिंग सेंटरमध्ये सन २०१६पासून ५०० केडब्ल्यूपी क्षमतेचा ग्रीड टाइप प्रकल्प सुरू आले. त्याला बॅटरीची गरज नाही. या संपूर्ण प्रकल्पासाठी ३ काेटी ७० लाख रूपये खर्च आला. मात्र, दहा वर्षे विजबिलात बचत होऊन ही रक्कम वसूल होईल. या प्रकल्पातून २०२१-२२ या वर्षभरात ५ लाख ४८ हजार ५७६ युनिट वीजनिर्मिती झाली. परिणामी रेल्वेचे वर्षाकाठी ५० लाख रुपये वाचले. यानंतर डीआरएम कार्यालयात १० केडब्ल्यूपी व मनमाड वर्कशाॅपला ३०० केडब्ल्यूपी क्षमतेचा साैर उर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला. मनमाडच्या प्रकल्पामुळे दरमहा चार लाखांची वीज बील बचत हाेत आहे, असे सौर उर्जा विद्युत अधिकारी संजय पगारे यांनी सांगितले. इतरत्र देखील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करता येतील, असेही ते म्हणाले.
रेल्वेचे नियोजन महत्त्वपूर्ण भुसावळ झाेनल ट्रेनिंग सेंटरमधील साैर ऊर्जा प्रकल्प २०१६पासून अतिशय व्यवस्थित सुरू आहे. या प्रकल्पामुळे वर्षभरात सुमारे ५० लाखांच्या विजबिलाची बचत झाली. भविष्यात संपूर्ण झाेनल ट्रेनिंग सेंटर साैर उर्जेच्या दिव्यांनी उजळून निघेल. एस.के.दास, प्राचार्य, झाेनल ट्रेनिंग सेंटर