भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याला सध्याची जागा अपूर्ण पडते. ही अडचण दूर करण्यासाठी सध्याच्या पोलिस ठाण्याच्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत २० लाख रूपये खर्च करून दुमजी कार्यालयाचे बांधकाम होणार आहे. यासाठी आमदार संजय सावकारे यांनी जिल्हा नियोजन समितीत मागणी केल्याप्रमाणे निधी उपलब्धतेची प्रक्रिया सुरू आहे.

नवीन इमारत बांधकामाचा आराखडा (प्लॅन) देखील तयार आहे. त्यासाठी निधी द्यावा म्हणून आमदार सावकारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे घातले आहे. दरम्यान, तक्रारदारांना सुविधा मिळावी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी नवीन कार्यालय बांधकाम गरजेचे आहे, असे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले.
नवीन इमारतीमधील नियाेजन
नवीन दुमजली इमारतीचे बांधकाम सध्याच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या इमारतीसमोरील माेकळ्या जागेत होईल. या इमारतीत खालील मजल्यावर एक माेठा हाॅल असेल. त्यात मिटींग हॉल, तक्रारदारांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था असेल. वरील मजल्यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच केबिन तयार होतील. दुय्यम अधिकारी, डीबी पथकासाठी स्वतंत्र कक्ष असतील.
पालिकेकडून नेहरू मैदानावरदेखील चाचपणी
एकीकडे बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या माेकळ्या जागेत नवीन दुमजली इमारत बांधकामाचा आरखडा तयार आहे. दुसरीकडे पालिकेच्या माध्यमातून शहरातील नेहरू मैदानावर बाजारपेठची नवीन इमारत बांधण्याच्या देखील हालचाली आहेत. यासाठी पालक मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला जाणार अाहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्याधिकारी आणि डीवायएसपींची भुसावळ शहर पोलिस ठाण्यात बैठक झाली.


