अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर करु नका रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन :

भुसावळ – रेल्वे प्रवाशांनी प्रवास करतांना अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलींग केल्याने उर्वरित प्रवाशांची गैरसोय होते .याकरीता प्रवाश्यांनीं अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करु नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे . अनावश्यक चैन पुलिंग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे.

रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. असे निदर्शनास आले आहे की, प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशीरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी शुल्लक कारणांसाठी करतात.

ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही तर त्या ट्रेनच्या मागून चालणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने चालतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच एखाद्या किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

अशा अवास्तव अलार्म चेन पुलींग घटनांवर मध्य रेल्वे मुंबई विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. यात दि. १.४.२०२२ ते २०.४.२०२२ या कालावधीत अलार्म चेन पुलींगच्या गैरवापराची १५७ प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे १०८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४७,२००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासन प्रवाशांना आवाहन करत आहे की, त्यांनी अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलींगचा सहारा घेऊ नये ज्यामुळे उर्वरित प्रवाशांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे.

प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचे आणि मर्यादित सामान घेऊन जाण्याचे रेल्वे प्रशासन आवाहन करत आहे. प्रवाशांना बॅटरीवर चालणाऱ्या कारच्या सेवांचाही वापर करता येईल किंवा स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात उपलब्ध व्हीलचेअरचा वापर करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इच्छित डब्यापर्यंत पोहोचू शकतात जेणेकरून गाड्यांमध्ये चढणे सुरळीतपणे आणि वेळेत करता येईल, त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर टाळता येईल