भुसावळ : तीन दिवसांपूर्वी 3 एप्रिल रोजी नाशिकजवळील लहावीत-देवळाली स्थानकादरम्यान रविवारी दुपारी 3.03 वाजता डाउन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रुळांवरून घसरले होते. या अपघाताची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. त्यात आता भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाच्या रेल्वे संरक्षा आयोगातर्फे 6 रोजी सकाळी 10 वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर या घटनेची चौकशीला सुरूवात करण्यात आली. रेल्वे संरक्षा आयोगाचे मनोज अरोरा यांनी या चौकशीला सकाळी सुरूवात केली.
प्रवासी व संबंधिताचे जाब-जवाब
लहावीट-देवळाली स्थानकादरम्यान डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-जय नगर पवन एक्स्प्रेसचे डबे रुळांवरून घसरून भयंकर अपघात झाला होता. या दुर्घटनेची रेल्वे विभागाने गंभीर दखल घेत रेल्वे संरक्षा आयोगातर्फे चौकशीचा निर्णय घेतला तर अपघाताबद्दल कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील स्थानक व्यवस्थापक कक्षात येऊन माहिती द्यावी, असे आवाहन रेल्वेने केले होते. दरम्यान, मंगळवारी भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस.केडिया, रेल्वे संरक्षा आयोगाचे अधिकारी मनोज अरोरा व अन्य उच्च पदस्थ अधिकार्यांनी अपघातस्थळी पाहणी केली. यावेळी मुंबईचे काही अधिकारी व भुसावळ डीआरएमचे अधिकारी उपस्थित होते.



