भुसावळची आदिती पतंगे हिने ’मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए ’पटकावला बहुमान ;

भुसावळ – आदिती पतंगे हिने ’मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए २०२१’ हा अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान पटकावला आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून असलेल्या बेस्ट स्माईलची देखील ती विजेती झालेली आहे. तीन दिवसीय ही स्पर्धा सिआटल शहरात आयोजित केली होती.
आदिती ही संगीता (मांडवगडे) पतंगे व प्रवीण पतंगे यांची एकुलती एक कन्या आहे. आईचे माहेर भुसावळ असून अदितीचा जन्म देखील भुसावळ येथे झालेला असल्याने भुसावळकरांसाठी अभिमानाची बाब आहे. तिचे १२ वी पर्यंतचे शिक्षण हे पुणे येथे झालेले आहे. अवघ्या १७ व्या वर्षी ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. तिथे बी. एस. (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) ही पदवी यशस्वीरित्या मिळवली. तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ती मायक्रोसॉफ्ट ह्या नामांकित कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत झाली.
बालपणापासूनच अदितीला मॉडेलिंग व अभिनयाची आवड होती. पेंडॅमीक कालावधीत तिने घरून काम करून, घर सांभाळून अतिशय चिकाटीने एम्पॉवरिंग ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ’मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए २०२१’ स्पर्धेत भाग घेतला. त्यात २२ स्पर्धकांमधून ती प्रथम विजेती ठरली.
अशी होती स्पर्धा-
स्पर्धेचे स्वरूप टॅलेंट राऊंड, इंटरव्यू, लेहेंगा राऊंड, इंट्रोडक्शन, इवेनिंग गाऊन राऊंड आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न-उत्तर राऊंड असे होते. ही स्टेट लेव्हल स्पर्धा होती. येथील सर्व स्पर्धक वॉशिंग्टन स्टेटमधले होते. या स्पर्धेत २२ स्पर्धक होते. जुलै २०२२ मध्ये ती नॅशनल लेव्हल ‘मिस इंडिया युएसए’ मध्ये वॉशिंग्टनची प्रतिनिधी म्हणून भाग घेणार आहे. आदितीने सातासमुद्रापार मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे