जळगाव : जिल्ह्यात कोरोना सुसाट पसरत असून भुसावळात तर सलग तीन दिवसांपासून रुग्ण संख्या शंभरीपार जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे प्रवाशांकडून अधिक कोरोना संक्रमण पसरत असल्याची भीती आहे. जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 266 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे
आतापर्यंत 2580 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 580 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 44 हजार 428 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 333 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शुक्रवारी 39 रुग्णांनी कोरोनावर (Corona) मात केली.

या शहरात आढळले नव्याने (Corona) बाधीत
जळगाव शहर 111
जळगाव ग्रामीण 01
भुसावळ 71
अमळनेर 06
चोपडा 35
पाचोरा 02
भडगाव 00
धरणगाव 01
यावल 03
एरंडोल 01
जामनेर 01
रावेर 02
पारोळा 02
चाळीसगाव 39
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 01
भुसावळातील कोरोनावाढीचे हे समोर आले कारण
रेल्वेमुळे देशभरातील प्रवाशांचा भुसावळ शहरासोबत थेट संपर्क येतो. त्यामुळे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने मुसंडी मारली आहे. तिसर्या लाटेतील पहिल्या रुग्णाला रेल्वेची ट्रॅव्हल हिस्ट्री होती. सध्याच्या अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 50 ते 52 टक्के अॅक्टिव्ह रुग्णांना ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. त्यापैकी काही रुग्ण रेल्वे संबधीत विभागातील बाधितांच्या संपर्कात आले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती, नियमांकडे दुर्लक्ष यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे.
पहिला रुग्ण आला रेल्वेने
रेल्वे स्थानकावरील कर्मचारी, वेंडर, सफाई कर्मचारी, स्थानकाबाहेरील विक्रेते, रिक्षाचालकांचा प्रवाशांसोबत संपर्क येतो. यामुळे शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. तिसर्या लाटेतील पहिला रुग्ण चंद्रपूर येथून रेल्वेनेच शहरात आला होता. रेल्वे स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी विना मास्कने बाहेर पडतात. प्रवासात बाधीत झाल्यास हे प्रवासी शहरात संक्रमण पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे.
फिजिकल डिस्टन्स पाळले जात नसल्याने पसरतोय कोरोना
भुसावळ शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे. 13.38 वर्ग किलोमिटर भागात तब्बल सव्वादोन लाख लोकसंख्या आहे. अंतर्गत भागात अनेक स्लम एरिया आहेत. यामुळे फिजिकल डिस्टंन्सिंग पाळले जात नाही. अद्यापही मास्क, फिजीकल डिस्टंन्सिंगचे नियम पाळले जात नाही. अंत्ययात्रा, विवाहसोहळा, साखरपुडा, मंगलकार्य आदींमध्ये अधिक गर्दी कायम आहे. रात्री हॉटेलिंग सुरू असल्याने संसर्ग फैलावतो.
भुसावळ शहर रेल्वेचे माहेरघर आहे. हजारो प्रवाशांचा संपर्क होतो. प्रवासात नियम पाळले जात नाहीत. स्थानकावर दररोज प्रवासी उतरुन शहरवासीयांच्या संपर्कात येतात. यामुळे संक्रमण वाढत असल्याची भीती आहे.


