शेतातच पोहोचले ज्ञान; महिला शेतकऱ्यांचा वाढला मान!मन्यारखेडा येथे कृषी कन्या महिला शेतकरी गटाला बांधावर प्रत्यक्ष मार्गदर्शन; स्मार्ट शेती, जैविक उपाययोजना आणि फार्मर कप २०२६ बाबत प्रशिक्षण :

भुसावळ( प्रतिनिधी) - जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथे कृषी कन्या महिला शेतकरी गटाला प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना आधुनिक, वैज्ञानिक आणि हवामान बदलाला पूरक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडली.

या भेटीदरम्यान कृषी विभागाच्या मेंटॉर संगिता पाटील, पाणी फाऊंडेशनच्या फील्ड ऑफिसर प्रियंका बैसाणे, उमेद मेंटॉर राहुल ठोसरे आणि प्रियंका पाटील यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावर्षीच्या एल निनोच्या पार्श्वभूमीवर बायोमिक्स व ट्रायकोडर्मा या जैविक घटकांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी 'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' स्पर्धेच्या मूल्यांकन प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. तसेच स्मार्ट शेती ॲपचा प्रभावी वापर, पक्षी थांबे तयार करण्याचे प्रशिक्षण आणि चिकट सापळे लावण्याबाबतची कार्यपद्धती (एसओपी) प्रत्यक्ष शेतात राबवून दाखविण्यात आली.

महिला शेतकरी गटाच्या सदस्यांनी सर्व मेंटॉर व पाणी फाऊंडेशनच्या टीमचे उत्स्फूर्त स्वागत केले. बैठकीनंतर सर्वांनी शेतातच एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतला. ज्ञान, संवाद, सहकार्य आणि आपुलकीने परिपूर्ण असलेली ही भेट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

«"एकजूट, वैज्ञानिक शेती आणि हवामान बदलाला समर्थ प्रतिसाद — हाच फार्मर कप २०२६ चा संकल्प!" या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.»