वर्धा जिल्हा हादरला : अवैध गर्भपात प्रकरणी कारवाई : अर्भकांच्या 11 कवट्या आणि 55 हाडे आढळल्याने खळबळ :


वर्धा : अवैध गर्भपात प्रकरणी कारवाई झाल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात अनेक अर्भकांचे अवशेष आढळल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यातील आर्वीत उघड झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आर्वीतील कदम रुग्णालयात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी कारवाई झाल्यानंतर रुग्णालयाच्या परीसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे.
अशी उघडकीस आली घटना
आर्वीतील अल्पवयीन 13 वर्षीय मुलगी 17 वर्षीय मुलासोबत झालेल्या शारीरिक संबंधांतून गर्भवती झाल्यानंतर संशयीत आरोपी असलेल्या 17 वर्षीय मुलाच्या आई-वडिलांच्या दबावात मुलीच्या आई-वडिलांनी अवैध गर्भपाताचा निर्णय घेतला. त्यासाठीचे पैसेही आरोपी मुलाच्या आई-वडिलांनीच डॉ.रेखा कदम यांना दिले. त्यानंतर डॉ.रेखा कदम यांनी 4 जानेवारीला 13 वर्षीय मुलीला कदम हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं. 6 जानेवारी 2022 तिचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या मदतीनं गर्भपात झालेलं अर्भक कदम रुग्णालयाच्या आवारात रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत फेकण्यात आले. पोलिसांपर्यंत ही बाब पोहोचल्यानंतर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रेखा कदमसह डॉ.रेखा कदम परीचारीका संगीता काळे यांना अटक करण्यात आली.
अनेक अर्भकांची हत्या झाल्याचा संशय
डॉ.रेखा कदम यांनी अवैधरीत्या आणखी काही गर्भपात डॉ.रेखा कदम केल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने दोघांची पोलिसांकडून चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. पोलिसांनी त्यानंतर कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅसची टाकी उघडल्यानंतर त्यात अर्भकांच्या 11 कवट्या आणि 55 हाडे आढळल्याने खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्यानं प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. सध्या पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना पाचारण करून सापडलेले अवशेष त्यांच्या ताब्यात दिले आहेत. सध्या मिळालेल्या कवट्या आणि हाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.हेमंत पाटील यांनी ताब्यात घेतले आहेत.