– जळगाव : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परीवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे परीवहन विभागानेही चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी मुंबईच्या दक्षता समितीमधील सहायक परिवहन आयुक्त दिनकर मनवर व राजेंद्र मदने या दोघांनी जळगावात येऊन आरटीओ कार्यालयात झाडाझडती केली. प्राथमिक चौकशी अधिकारी, कर्मचार्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळले आहे.

जळगाव आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार : भुसावळचे आमदार संजय सावकारेंची चारचाकी परस्पर केली मंत्री अनिल परबांच्या नावावर
भुसावळातील एजंटावर आरोप
या प्रक्रियेत खोटेनगरात राहणार्या अशोक पाटील यांच्या मोबाइलचा वापर झाला आहे. पाटील यांनी भुसावळातील आरटीओ एजंट पप्पू भोळे यांनी हा मोबाइल वापरल्याचा दावा केला आहे. त्या अनुषंगाने परीवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशाने गुरुवारी दोन अधिकारी जळगावात दाखल झाले. त्यांनी उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही यांच्या दालनातील संगणक व फायलींची तपासणी केली. सावकारे यांच्या कार ट्रान्सफर प्रकरणात हलगर्जीपणा झाला असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. शुक्रवारी दिवसभर ही चौकशी सुरू राहणार आहे.
सीमा नाक्यांवर होणार चौकशी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरच्या सीमा नाक्यांवर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार केली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी दक्षता समितीचे एक पथक कर्की नाक्यावर तपासणीसाठी येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.


