भुसावळ : राज्यातील ओमॉयक्रॉन संकटामुळे प्रशासनाने कठोर नियमांची अंमलबजावणी आजपासून लागू केल्याने पोलिस प्रशासनासह स्थानिक प्रशासनही कठोर कारवाईसाठी पुन्हा सरसावले आहे. रात्री नऊ ते पहाटे सहा पर्यंत जमावबंदी आदेश लागू असल्याने चारपेक्षा अधिक लोक आता रस्त्यावर दिसल्यास पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत शिवाय शहर तालुक्यात मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार असून ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
शहर व बाजारपेठ हद्दीत नाकाबंदीद्वारे होणार कठोर कारवाई
ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता शासनाने पुन्हा निर्बंध लावले आहेत. त्यात रात्री नऊ ते पहाटे सहा वाजेपर्यंत जमाव बंदीचे आदेश असल्याने यंदादेखील थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पाणी फेरले गेले आहे. प्रशासनाची नजर चुकवून काही लोक रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजेनंतर शहरातील दुकाने (आस्थापने) सुरू दिसल्यास त्यांच्यावरही कारवाईचे संकट आहे शिवाय शहरातील रस्त्यांवर चार-पाच पेक्षा जास्त नागरीक एकत्र आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.शहर व तालुक्यात हॉटेल्स, ढाब्यांसह पार्ट्यांवर करडी नजर
पार्ट्या, समारंभातील गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरू शकते त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे अतिरिक्त निर्बंधांचे पालन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी शहर, तालुका, बाजारपेठ आणि शहर वाहतूक शाखेसोबतच आरसीपी प्लॉटून पथक गस्तीवर असेल. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे स्वत: गस्तीवर असतील तर शहर हद्दीत पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे तर बाजारपेठ हद्दीत निरीक्षक दिलीप भागवत यांच्या नेतृत्वात गस्त घालण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात सात ठिकाणी नाकाबंदी असेल. त्यात ड्रंक अँड ड्राईव्ह, वेगात गाडी चालवणे, तीनसीट, विना परवाना वाहन चालवणार्यांवर थेट कारवाई होईल.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी वगळता पोलिसांची पाच स्वतंत्र पथके गस्त घालतील. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 पथके रात्री 9 वाजेनंतर गस्तीवर असतील. ज्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन जमाव बंदीचे उल्लंघण करतील त्यांच्यावर संचारबंदीचा नियम मोडला म्हणून गुन्हा होईल. पथके हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, हॉल, पार्ट्या होणार्या ठिकाणी अचानक पाहणी करतील.

पालिकेकडून आता पाचशे रुपये जागेवरच दंड
प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी पालिकेची प्रशासक म्हणून सूत्रे घेतली आहेत. यानंतर गुरुवारी झालेल्या बैठकीत शहरात कोरोना नियमांचे पालन व्हावे, यावर चर्चा झाली. त्यामुळे मास्क न वापरणारे, मास्क ऐवजी तोंडावर केवळ रुमाल बांधणारे, नियमांचे पालन न करणार्यांवर जागेवरच कारवाई केली जाणार असल्याचे पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.
या गैर प्रकारांवर पोलिसांचे बारीक लक्ष
चारपेक्षा अधिक नागरीक एकत्र दिसल्यास जमावबंदीचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा
भुसावळातील मोकळी मैदाने, व्यापारी संकुलातील रीकाम्या जागेवर मद्य पार्टी सुरू असल्यास मद्यपींवर कायदेशीर कारवाई होणार
भुसावळातील अनेक ढाब्यांसह हॉटेलमध्ये बेकायदा मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळताच दोषी ग्राहकांसह हॉटेल मालकांविरोधात गुन्हे दाखल होणार
घराच्या छतावर, गच्चीवर, हॉटेल्स, ढाब्यांवर गर्दी आढळल्यास होणार पोलिसांकडून कठोर कारवाई
थर्टी फर्स्ट, नववर्षाला एकत्र जमून पार्टी किंवा डान्स पार्टीचे आयोजन केल्यास पोलिस कायदेशीर कारवाई होईल
भुसावळ शहर, बाजारपेठ व तालुका हद्दीतील हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंटवर पोलिसांचे लक्ष असेल. तेथे नियमांचे पालन होते किंवा नाही? हे सातत्याने तपासणीसाठी बाजारपेठ हद्दीत दोन वाहने सतत गस्त घालतील
सर्वांच्या सुरक्षेसाठी कोविड अनुरुप वर्तन करावे शिवाय मास्कचा वापर न केल्यास 500 रुपये दंडात्मक कारवाई भुसावळ पालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे


