भुसावळात वीज कर्मचाऱ्यास मारहाण : तिघां विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ : येथील वीज वितरण प्रशासनातर्फे थकबाकी असलेल्या वीज बिलाची वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत घरगुती तसेच व्यावसायिक व्यापाराचे बिल वसूल करण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान स्टेशन रोड परिसरात विजबिल वसूली पथकातील कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्याचा निषेध म्हणून वीज वितरणतर्फे शहरातील चार विभागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत वीजपुरवठा सुरू न करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरात महावितरण प्रशासनातर्फे चार विभागात पथक तयार करून वीज बिल वसुली अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील स्टेशन रोड परिसरात सातारा पूल विभागातील कर्मचारी सुधीर भारंबे आणि संदीप सोनवणे हे वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले असता, एका व्यावसायिकाकडे घरगुती दोन बिल प्रत्येकी तीन हजार रुपये तर 6 हजार रुपये व्यावसायिक बिल अशी थकबाकी होती. कर्मचाऱ्यांनी या व्यवसायिकाचे बिल भरण्याची मागणी केली. त्यावर संबंधित व्यवसायकाने पैसे नसल्याचे सांगितले, तर कर्मचाऱ्यांनी घरगुती बिल नंतर भरा, अगोदर व्यवसायिक बिल भरण्याची सूचना केली. त्यामुळे संतापलेल्या व्यावसायिकाने कर्मचारी संदीप सोनवणे यांची गचंडी पकडली तर सुधीर तांबे यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरात साडे पाच कोटींची थकबाकी

भुसावळ शहरात एकूण 10 हजार ग्राहकांकडे साडेपाच कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे यासाठी शहरातील शिवाजीनगर ग्राउंड सातारा फुल ठाणे नहाटा चौफुली या विभागीय कार्यालयातील 50 कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता पी. आर. घोरुडे यांनी केली आहे.

पोलीस बंदोबस्त द्यावा
वीज वितरण कर्मचाऱ्यांना शहरात संवेदनशील भागात वीज बिलाची वसुली करण्यासाठी जावे लागते या दरम्यान अनेकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असते तर काही संतप्त ग्राहक कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करतात अशा वेळी पोलीस सुरक्षा प्रदान करण्याची मागणी उपव्यवस्थापक नयना सोनवणे यांनी केली आहे