भुसावळ : दीपनगरातील 210 प्रकल्पात कोळसा वाहून नेणार्या कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याने 58 वर्षीय कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. अशोक बाबूराव हातकर (58, फेकरी) असे मयत कंत्राटी सफाई कामगाराचे नाव असून या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दीपनगरातील 210 प्रकल्पात कोळसा वाहून नेणार्या विभागात (कन्व्हेअर बेल्ट) येथे अशोक हातकर यांची शुक्रवारी ड्युटी होती मात्र अचानक हातकर हे कोळसा वाहून नेणार्या कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याचे सफाई कर्मचारी सुरेश बळीराम मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर मशीन थांबवण्यात आले. अत्यवस्थ अवस्थेत हातकर यांना भुसावळ ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. मयत सफाई कर्मचारी हे कंत्राटी पद्धत्तीने कार्यरत असल्याचे व पूजा इंटरप्रायजेस या कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने कर्मचार्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून वरीष्ठ अधिकार्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.



