जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही : जळगावात पोलिस निवासस्थानांचे उद्घाटन :

जळगाव : राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी हा दिवसरात्र काम करतो. त्यासोबत प्रत्येक पोलिस कर्मचारी व अधिकारी यांना निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे आगामी काळातही जळगावप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यासाठी शासन कटीबध्द असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. ते महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण मंडळ, मुंबई यांच्याकडून बांधण्यात आलेल्या जळगाव येथील 252 पोलीस कर्मचारी निवासस्थान इमारतीचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी आमदार रावसाहेब पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गृहमंत्र्यांनी केले वृक्षारोपण
प्रथम दिलीप वळसे पाटील जिल्हा यांना पोलीस दलातर्फे सलामी देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे व पोलिसांच्या गृहकुलांचे लोकार्पण करण्यात आले. या नवीन वसाहतीमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर 252 पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात सात कर्मचार्‍यांना क्वॉटरच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

गुजरातमध्ये मोठी कारवाई : 400 कोटींचे हेरॉईन जप्त
जळगावसह भुसावळसासाठी सीसीटीव्ही द्या : पालकमंत्री
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव आणि भुसावळ शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाल्यास सीसीटीव्ही बसविण्यात यावे तसेच पोलिस वसाहतीच्या दुसर्‍या फेजसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली. जिल्ह्यातील पोलिस स्टेशनांचा दर्जा वाढविण्यात आल्यास राजकीय, शैक्षणिक गुन्हेगारीचा पोलिसांना पडणारा ताण यामुळे कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.