जळगाव – शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. आरोग्य विभागाच्या उपाययोजनेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला आहे. मात्र राज्यात ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळून आल्याने राज्यात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना किंवा ओमायक्रॉन विषाणुच्या नियंत्रणासाठी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात आले आहे. लसीकरण न झालेल्या नागरिकांना पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल देवू नये असे आदेश महापालिका उपायुक्त शाम गोसावी यांनी दिले आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपये दंड :
बाजारपेठेत किंवा पेट्रोलपंपावर येणार्या सर्व ग्राहकांचे प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही डोस घेतल्याबाबत लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करावी. त्यासाठी स्वतंत्र कर्मचार्याची नेमणूक करावी. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोलपंप चालकांविरोधात किंवा प्रतिष्ठांनाविरोधात 50 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. शहरात आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे की नाही, यासाठी महापालिका प्रशासनातर्फे स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.



