रावेर : रावेर येथील एस.टी. महामंडळाच्या चालकाने निलंबित केल्याच्या तणावाखाली एसटी डेपोतच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
रावेर आगारातील एस.टी.चालक राहुल विश्वनाथ कोळी (35) यांनी काहीतरी विषारी औषध घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान डेपोमध्येच घडली. या घटनेनंतर चालक अचानक खाली कोसळल्याने त्यांना एस टी डेपो मॅनेजर जी.पी.जंजाळ व एस.टी. कर्मचारी, कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी तत्काळ एस.टी.बसमध्ये टाकून रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तत्काळ उपचार केल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. रावेर आगारातील एस.टी.चालक ₹ राहुल कोळी हे रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी असून त्यांना काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाकडून निलंबित केल्याचे पत्र मिळाल्याने त्या नैराश्यामुळे त्यांनी आज विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .



