जळगावातील धक्कादायक घटना : फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – रामानंदनगर पोलिसांकडून संशयिताला अटक

जळगाव : जळगाव शहरातील एका भागातील 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या नीलेश नागराज राठोड (19) या तरुणाला रामानंद नगर पोलिसांनी बुधवार 24 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. आरोपीला गुरुवार, 25 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

फोटो व्हायरलची धमकी देत अत्याचार
संशयित नीलेश याने पीडितेशी शिक्षण सुरु असताना ओळख निर्माण केली. त्या दरम्यान अश्लील प्रकार करतानाचे त्याने फोटो काढले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर फोटोही व्हायरल केले. इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने अल्पवयीन मुलीने सोमवार, 22 नोव्हेंबर रोजी घर सोडले होते. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, संशयीत निलेश राठोड यास अटक करून रामानंदनगर पोलिसांनी पीडितेला नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पीडितेने तिच्यासोबत आतापर्यंत घडलेल्या सर्व प्रकाराची आपबिती पोलिसांसमोर कथन केली. पीडितेच्या जबाबावरुन गुन्ह्यात बलात्काराचे कलम वाढविण्यात आले. अटकेतील संशयीत नीलेश राठोड यास गुरुवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यास 29 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख हे करीत आहेत.