नाशिक येथे भाजपा पदाधिकार्‍याची हत्या: राजकीय वैमनस्यातून हत्येचा संशय : एका पक्षाच्या पदाधिकार्‍यावर संशय

नाशिक : नाशिकमध्ये गुन्हेगारी बोकाळली असून चार दिवसात तीन जणांच्या हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे शहरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर आक्रमक झालेल्या भाजपा पदाधिकार्‍यांनी सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करा, अशी मागणी भाजप नेत्यांनी उचलून धरली आहे. यावेळी समर्थकांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमकही उडाली.चार दिवसात तिसरी हत्या
नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन केला. त्यांना घराबाहेर बोलावून धारदार शस्त्राने वार करत इघेंची निर्घृण हत्या केली. नाशिकमधील कार्बन नाका परीसरात ही घटना घडली. या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पहाटे सहा वाजता नेमकं काय घडलं, याचा शोध पोलीस घेत आहेत.संशयित आरोपी राष्ट्रवादीचा पदाधिकारी
राजकीय युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, नाशिक शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात अधिकची कुमक बोलावून घेतली आहे. नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गर्दी केली. अवघ्या चार दिवसात नाशिकमधील हत्येची ही तिसरी घटना धडल्याचं समोर आलं आहे. नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.