कौन बनेगा करोडपती’ची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवत तीन लाखांचा गंडा – रांजणगावच्या महिलेच्या फसवणूक प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल/

जळगाव : कौन बनेगा करोडपतीची 25 लाखांची लॉटरी लागल्याचे भासवून चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील महिलेची दोन लाख 92 हजार 709 रुपयांत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लॉटरीच्या आमिषाने गंडवले
रांजणगाव येथील शबानाबानो शेख सादीक (40) या वास्तव्यास आहेत. 8 नोव्हेंबर रोजी शबानोबानो यांना अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. फोनवर बोलणार्‍या संबंधितांने शबानोबानो यांना तुम्हाला 25 लाख रुपयांची कौन बनेगा करोडपतीची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरुन वेगवेगळ्या नावांनी संबंधितांनी फोन करुन शबानोबानो यांचा विश्‍वास संपादन केला तसेच लॉटरी लागलेले 25 लाख रुपये मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स व इतर चार्जेसच्या नावाखाली शबानोबानो यांना ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार शबानोबानो यांनी संबंधितांना दहा दिवसात वेळोवेळी दोन लाख 92 हजार 709 रुपये ऑनलाईन पाठविले. पैसे स्विकारल्यानंतर शबानोबानो यांना कुठल्याही प्रकारचे लॉटरी लागल्याचे पैसे मिळाले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर शबानोबानो यांनी बुधवार, 17 नोव्हेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या क्रमाकांवरुन फोन करणार्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.