भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील वर्दळीच्या श्रीराम मंदिर भागातील प्रॉपर्टी विक्रीच्या बहाण्याने तक्रारदारासह त्यांच्या नातेवाईकांकडून तब्बल 62 लाख तीन हजार 600 रुपये उकळण्यात आले शिवाय महागडी प्रॉपर्टीची विक्री केल्याने जळगावच्या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
. या प्रकरणी हेमलता जवाहरलाल बंब (60, शेरे पंजाब सोसायटी, कमलेश अपार्टमेंट, अंधेरी ईस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी अभय अमृतराव शिंदे, एजंट अक्षय मनोज अग्रवाल, अश्विन चौधरी (सर्व रा.जळगाव) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार हेमलता बंब यांचे आजोबा मूलतानचंद बंब यांनी वडिलोपार्जीत मालमत्ता आई चंदाबाई बंब यांच्या नावावर केली होती. मालमत्तेची विक्री करण्यासाठी एजंट अक्षय अग्रवाल व अन्य दोघा संशयीतांच्या माध्यमातून व्यवहार निश्चित करण्यात आला मात्र प्रॉपर्टी विक्रीसाठी विविध सबबी सांगत संबंधितानी 14 मे 2020 ते आजपर्यंत वेळोवेळी बंब यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांकडून 62 लाख तीन हजार 600 रुपये उकळले व अविनाश बाविस्कर व निखील खडसे यांना प्रॉपर्टी परस्पर विक्री केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.



