भुसावळचे डॉ. तुषार पाटील यांचे प्रिक्वॉलिफाईड रन स्पर्धेत यश ; रात्रीच्या काळोखाला छेदत धावले चक्क 74 किलोमीटर ;


भुसावळ –
लद्दाख येथे होणार्‍या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुण्यात प्रिक्वॉलिफाईङ रन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भुसावळच्या डॉ. तुषार पाटील यांनी रात्रीच्या काळोखाला छेदत 74 किलोमीटरचे अंतर व 1138 मीटरची उंची 10 तास 49 मिनिटात पूर्ण केले.
लद्दाख येथे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दरवर्षी अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली जाते. त्यासाठी 55 किलोमीटर, 111 किलोमीटर, 222 किलोमीटर, 333 किलोमीटर, 444 किलोमीटर व 555 किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटात देश-विदेशातील सर्वोत्तम धावपटू सहभाग नोंदवत असतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रिक्वॉलिफाईड रन आयोजित केले जातात. अशा प्रकारचा रन पुणे येथील गोठावडे फाटा ते लवासा सिटी व तेथून पुन्हा त्याच मार्गे परत असा तब्बल 74 किलोमीटरचा रन आयोजित केला होता.
विशेष म्हणजे 1138 मीटर उंचीचे शिखर गाठायचे होते. शनिवारी रात्री ठीक दहा वाजता भुसावळचे डॉ. तुषार पाटील, मुंबईचे सतीश गुजरण व तरुण शर्मा, पुण्याचे मंगेश शिंदे, विशाल, हरी या सहा धावपटूंनी धावायला सुरुवात केली. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सतत अकरा तास धावून 74 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्यामध्ये डॉ. तुषार पाटील व सतीश गुजरण यशस्वी झाले. भुसावळच्या डॉ. पाटील यांनी हे अंतर 10 तास 49 मिनिटात पूर्ण केले. डॉ. तुषार यांचे प्रवीण फालक, डॉ. निलिमा नेहेते, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील, संतोष गवळे, विकास पाटील व भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *