शून्य टक्के व्याजाने विद्याथ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जावे – निलेश कोलते यांची मागणी ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल तर्फे एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी उपक्रम; प्रशासन व शासनाला देणार निवेदन ;

भुसावळ( प्रतिनिधी )-
विद्यार्थी व पालकांकडून शैक्षणिक संस्थांनी अतिरिक्त शुल्क वसूल करू नये, विद्यार्थी ज्या सेवांचा वापर करत नाही त्या सेवांसाठी शुल्क आकारणी थांबवावी, शिक्षण शुल्क समितीने नव्याने शिक्षण शुल्क निश्चित करावे, बँकांनी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज लागू करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांच्यातर्फे करण्यात आली आहे. याविषयी संबंधित मंत्री व विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती कोलते यांनी दिली.
भुसावळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी विद्यार्थी वापरात नसलेल्या सुविधांचे शुल्क कमी करावे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी. शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्क निश्चितीची प्रक्रिया राबवून नवीन शुल्क निश्चित करावे, तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थांनी शुल्क आकारणी करू नये, केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावे, नर्सरी ते दहावीचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांनी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घ्यावे, अशी सक्ती करू नये, बोर्डाने जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावी, इतर महागडी पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये, ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये, अशी मागणीही आली आहे. शासनाने याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी शासन, प्रशासन, शाळा, महाविद्यालयांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रतिनिधी लवकरच संबंधित मंत्री आणि शिक्षण शुल्क समितीच्या संचालकांची भेट घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *