भुसावळ :

दहा हजारांच्या लाच प्रकरणी अटकेत असलेल्या वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह हवालदाराची शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रसंगी दोघा संशयीतांना न्या.एस.पी.डोरले यांनी जळगाव एसीबीच्या कार्यालयात दर मंगळवारी हजेरी लावण्याचे आदेश दिले.
साकेगाव येथील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर (क्रं.एम.एच.40 एन. 4086) असून वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्या द्वारे वाळू वाहतूक केली जाते मात्र या वाहनावर कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी (56, रा.भिरूड कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) व कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (31, पोलीस वसाहत, वरणगाव ता.भुसावळ) यांनी दहा हजारांची लाच मागितल्यानंतर तक्रारीनंतर त्यांना सापळा रचून गुरुवारी अटक करण्यात आली. नंतर आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली व ती शनिवारी संपल्याने न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोरले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी आरोपींतर्फे जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तो मंजूर करण्यात आला. सरकारतर्फे अॅड.विजय खडसे तर आरोपीतर्फे अॅड.आर.के.पाटील यांनी काम पाहिले. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


