भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासना कडून पुन्हा धडक कारवाई करण्यात येत असून लग्न सोहळ्याला उपस्थितीतीचे निर्बंध लावण्यात आले असतांना देखील लोक लग्न समारंभासह सर्वत्र गर्दी करतांना दिसत आहे. शासनाच्या त्रिसूत्री नियमांची पायमल्ली होत असल्याने पुन्हा कोरोनाचे संकट वाढू नये व लॉकडाऊन होवू नये यासाठी प्रशासनाने ठोस व कठोर पाऊल उचलली आहे . या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी मिळून संयुक्त कारवाई केली असून तब्बल वीस हजाराचा दंड वसुल करण्यात आला आहे . याकारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
21 फेब्रुवारी ही दाट लग्न तिथी असल्याने येथील स्टार रिसॉर्ट्स ,बालाजी लॉन, आदित्य लॉन,संतोषी माता हॉल या ठिकाणी लग्न सोहळा सुरु असतांना विवाह सोहळ्यात अचानक उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदी पथकाने कार्यालयात पहाणी करीत संयुक्त कारवाई केली . यावेळी मांडवात 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होते तसेच वीना मास्क लोक आढळुन आल्याने स्टार रिसॉर्ट्स ,बालाजी लॉन, आदित्य लॉन,संतोषी माता हॉल यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठविण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होवु नये यासाठी शासनाकडुन अलर्ट जारी करण्यात आला आहे. लग्नसराईत गर्दी वाढु नये, यासाठी पालिका व पोलिस प्रशासन यांची करडी नजर असुन विवाह सोहळ्यात नियमांचे पालन, सामाजिक अंतर किंवा मास्क न लावलेली व्यक्ती आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
लग्न समारंभात शासनाने ठरवून दिलेले ५० जणापेक्षा जास्त व-हाडी( व्यक्ती )मंगल कार्यालयात आढळून आल्यास ५० हजार रुपये दंड व गुन्हा दाखल करण्यात येणार असून वधू-वर यांच्या परिवारासह पाहुणे यांनी लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्यांना सुद्धा कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याची तंबी सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली.
तसेच
कोरोना प्रदूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना करण्यास सुरुवात झाली असून लग्न सोहळ्यात ५० जणापेक्षा जास्त जमाव करण्यास व डीजे वाजविण्यास प्रशासनाची बंदी असल्यानंतही कायदयाचे उल्लंघन करीत डीजे वाजविण्याऱ्या दोन डिजेवर पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करून पोलीस स्टेशनला जमा केले आहे.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वात प्रथम कारवाई शहर पोलीस स्टेशन हद्दीत मुलीच्या वडिलांवर कलम १८८ प्रमाणे झाली असून गुन्हा नोंद करण्यात येवून याधडक मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.



