भुसावळ पंचायत समिती सभापती निवडीसाठी मंगळवारी विशेष सभा –


भुसावळ (प्रतिनिधी )-
पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रीक्त झालेल्या पदावर, नवीन सभापती निवडीसाठी मंगळवार, 16 रोजी दुपारी तीन वाजता पंचायत समिती सभागृहात विशेष सभा होणार आहे. सभापती पदावर पं.स. सदस्या वंदना उन्हाळे यांची वर्णी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सभापतीपदी अडीच वर्षानंतरच्या दुसर्‍या टर्ममध्ये भाजपच्या मनीषा भालचंद्र पाटील यांना संधी मिळाली होती. मात्र आधीच ठरल्याप्रमाणे मनीषा पाटील यांनी दीड वर्षांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. तसेच उपसभापती वंदना सदानंद उन्हाळे यांनीही राजीनामा सादर केला होता
या रीक्त पदांवर निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार दीपक धीवरे यांनी 16 रोजी दुपारी तीन वाजता विशेष सभा बोलावली आहे. या सभेत सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे. सध्या पंचायत समितीत भाजपचे संख्याबळ अधिक आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरही भुसावळ पंचायत समितीवर परीणाम झालेला नाही. आता केवळ वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *